क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात पहिल्यांदा नावारुपाला आलेला प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. क्रिकेटच्या या अमर्यादित षटकांच्या स्वरुपात दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज २ डाव खेळतात.
परंतु, कधी-कधी एखाद्या संघाला फक्त एकच डाव खेळायला मिळतो. असे तेव्हा होते, जेव्हा प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारतो आणि विरुद्ध संघ त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कमी धावांवरच सर्वबाद होतो.
यावेळी कमी धावा करणाऱ्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी केलेला संघ पुन्हा फलंदाजीला पाचारण करुन आधीचेच आव्हान पुर्ण करायवयास लावतो. हा निर्णय प्रथम फलंदाजी करणारा संघ घेतो. परंतु हे सर्व होताना पहिल्या संघाच्या धावा व दुसऱ्या संघाच्या धावा यांच्यात पहिल्या संघाच्या पहिल्या डावातील धावा या दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावातील धावांपेक्षा २०० किंवा अधिक असाव्या लागतात. यालाच क्रिकेटच्या भाषेत फॉलोऑन म्हणतात.
कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतर एखाद्या संघाला विजय मिळवणे खूप अवघड असते. परंतु, क्रिकेट इतिहासात असेही काही कसोटी सामने झाले आहेत, ज्यामध्ये संघांनी फॉलोऑन मिळालेला असताना शानदार विजय मिळवला आहे – 3 Times When A Team Wins The Test Match After Follow On
हे आहेत ते ३ सामने…
१. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
क्रिकेटमध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतर शानदार विजय मिळवण्याचा पराक्रम सर्वप्रथम इंग्लंडने केला होता. डिसेंबर १८९४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७ दिवसांच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने हा कारनामा केला होता. यावेळी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज गिफेनने १६१ आणि सिडनी एडवर्ड ग्रेगरीने २०१ धावा करत इंग्लंडला ५८६ धावांचे भलामोठे आव्हान दिले होते. याला प्रत्युत्तर देत इंग्लंड पहिल्या डावात फक्त ३२५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ २६१ धावांनी आघाडीवर होता.
म्हणून इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळण्यासाठी उतरला होता. यावेळी इंग्लंडच्या अल्बर्ट वार्ड यांच्या ११७ धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ४३७ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात खेळताना १६६ धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यामुळे इंग्लंडने १० धावांनी तो सामना खिशात घातला होता.
२. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
जुलै १९८१मद्ये इंग्लंडने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया संघाला फॉलोऑन मिळाल्यानंतर पराभूत केले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत ४०१ धावा केल्या होत्या. यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन डायसनच्या १०२ धावांचा समावेश होता. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या डावात सर्वबाद होत फक्त १७४ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ २२७ धावांनी आघाडीवर होता.
दुसऱ्या डावात इंग्लंडने फॉलोऑन मिळाल्यानंतर ३५६ धावा केल्या होत्या. यामध्ये इयान बॉथमच्या नाबाद १४९ धावांचा समावेश होता. म्हणून ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी १३० धावांची आवश्यकता होती. परंतु, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव फक्त १११ धावांवरच संपुष्ठात आला होता. त्यामुळे इंग्लंड संघ १८ धावांनी जिंकला होता. इंग्लंडचा इयान बॉथम हा त्याच्या कामगिरीमुळे सामनावीर बनला होता.
३. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
मार्च २००१मध्ये कोलकाता येथे भारतीय संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करायचे ठरवले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह वॉ याच्या ११० धावा आणि मॅथ्यू हेडन याच्या ९७ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारताला ४४५ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव फक्त १७१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ २७४ धावांच्या आघाडीवर होता.
भारतीय संघाला दुसऱ्या डावात फॉलोऑननंतर खेळायचे होते. सर्वांना वाटत होते की, सामना भारताच्या हातून निसटला आहे. परंतु, दुसऱ्या डावात भारताने ७ बाद ६५७ धावा केल्या होत्या. यामध्ये भारताच्या व्हिव्हिएस लक्ष्मणच्या २८१ आणि राहुल द्रविडच्या १८०धावांचा समावेश होता. त्यांच्या या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ३८४ धावांची गरज होती आणि ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात फक्त २१२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारताने १७१ धावांनी शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात आपल्या शानदार कामगिरीसाठी व्हिव्हिएस लक्ष्मणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
ट्रेंडिंग लेख-़
वनडेत ‘पार्ट टाईम गोलंदाजी’ करत १००पेक्षा जास्त विकेट्स घेणारे ४ फलंदाज
५०० सामने खेळणारे ३ भारतीय दिग्गज क्रिकेटपटू, एक आहे…
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २ वेळा नर्वस नाईंटीजवर बाद होणारा एकमेव भारतीय