क्रिकेटमधील अनेक गोष्टी दिवसेंदिवस बदलत आहे. सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून तर क्रिकेटप्रेमींना ज्या गोष्टी सहसा पाहायला मिळत नाहीत, त्या देखील मिळून लागल्या. अगदी ड्रेसिंग रुममधील गमतीजमती, पत्रकार परिषदांमधील तणावपुर्ण वातावरण, सराववेळीच्या मनोरंजक गोष्टी एवढंच काय अगदी कसोटी सामन्यावेळी खेळाडू लंच मध्ये काय काय खातात? याचीही माहिती चाहत्यांना मिळू लागली.
काही वर्षांपुर्वी क्रिकेट खेळले जायचे तेव्हा खर्च वाचावा म्हणून संघात असलेले स्थानिक क्रिकेटर आपल्या घरीच कसोटीच्या वेळी राहत असे. फक्त परदेशातून आलेल्या संघाचे सदस्य व यजमान संघातील जे खेळाडू त्या शहरातील नाही, तेच हॉटेलवर राहत असे. तेव्हा हॉटेलच्या रुमदेखील परवडणाऱ्या नसे. बऱ्याच वेळा संघातील दोन किंवा तीन खेळाडू एकाच रुममध्ये राहात असे. परंतू क्रिकेटमध्ये जसाजसा पैसा येत गेला, तसे यातही बदल होत गेले. आता अनेक वेळा संघ हे ५ स्टार हॉटेलमध्ये कसोटी किंवा इतर सामन्यावेळी राहतात. हे हॉटेल स्टेडियमपासून जवळच असते. कधी कधी हॉटेल जरी दुर असले, तरीह सुविधांना पहिले प्राधान्य दिले जाते.
आपण जिथे दौऱ्यावर गेल्यावर राहातो, ती रुम खेळाडूंची हक्काची रुम असते. जेवढे दिवस आपण तिथे आहोत, तेवढे दिवस खेळाडू तिथे आराम करतात. परंतु याचबरोबर दौऱ्यावर गेल्यावर किंवा मायदेशात जरी खेळत असलो तरी खेळाडूंसाठी अजून एक हक्काची जागा असते. ती जिथे सामना सुरु आहे, त्या स्टेडियमवर असते. कधी तिथे अतिशय तणावपुर्ण वातावरण असते, तर कधी अतिशय आनंदी. कधी कधी तर इतके रटाळवाणे वातावरण असते की चाहते खेळाडूंना मोठ्या स्क्रीनवर किंवा टेलिव्हीजन सेटवर आळस देताना पाहतात. क्रिकेटमध्ये त्या रुमला किंवा जागेलाच ड्रेसिंग रुम असे म्हटले जाते.
जेव्हा दौऱ्यावर आलेला संघ सामना खेळण्यासाठी मैदानावर येतो, तेव्हा संघ पहिला ड्रेसिंग रुममध्ये जातो. आपण जेव्हा पाहतो की; खेळाडू हेडफोन घालून बसमधून उतरुन चाललेले दिसतात, तेव्हा ते ड्रेसिंगरुममध्येच जात असतात.
ड्रेसिंग रुम म्हणजे काय?
अशी जागा, जिथे खेळाडू आपले खेळण्याचे साहित्य ठेवतात. तसेच सामना सुरु असताना खेळत नसेल तर याठिकाणी बसून आराम करतात किंवा एकमेकांशी चर्चा करतात. येथे संघातील सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक व राखीव खेळाडू हे सदैव असतात. तर मैदानावर खेळत असलेले खेळाडू दुखापत झाली किंवा ब्रेक घेतला तर येथे येतात. तसेच संपुर्ण संघ ब्रेकमध्ये येथे जमतो. ड्रेसिंग रुममध्ये अनेक रुम्स असतात. सर्वात मुख्य भाग हा असा असतो, जिथून सर्व सामना व्यवस्थित दिसतो. यानंतर एका मोठ्या रुममध्ये लॉंजसारखी रचना केलेली असते. जिथे खेळाडू मोठ्या सोफ्यांवर आराम करु शकतात.
ड्रेसिंग रुममध्येच असलेल्या चेंजिंग रुममध्ये खेळाडूंना छोटे कपाट दिले जातात. शिवाय त्यांच्या जर्सी व कपडे अडकविण्याच्या जागाही असतात. सामना सुरु असताना या रुममध्ये अनेक वस्तू कशाही पडलेल्या असतात. गमतीचा भाग म्हणजे स्टिवन स्मिथसारखे खेळाडू या रुममध्ये कधी कधी ९-९ बॅट घेऊन आलेले येतात. अनुभवी खेळाडू पटापट आपली कपाटे घेतात तर काही खेळाडू हे अंधश्रद्धा पाळतात. काही वेळा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कपाटावर एखादा देवाचा किंवा दुसरा फोटोही लावतात. अंधश्रद्धा म्हणून काही क्रिकेटर विशिष्ट दिशेकडे तोंड असलेल्या कपाटातच आपल्या वस्तू ठेवतात. काही चेंजिंग रुममध्ये खेळाडूंच्या कपाटांना आधीच नावं व्यवस्थापनाने लावलेली असतात. चेंजिंग रुमच्या आतमध्ये शॉवर घेण्यासाठी खास व्यवस्था असते. तसेच तेथे वॉर्म बाथसाठी बाथ टबही असतो.
सामना जिंकल्यानंतर चेंजिंग रुममध्ये शँपेन किंवा बीअर खेळाडू हवेत उडवतात तसेच येथे सेलिब्रेशन करतात.
याच ड्रेसिंग रुमजवळ खास डायनिंग रुम असते. जिथे अंदाजे २०-२५ लोकं आरामात जेवण करु शकतात. बऱ्याच वेळा क्रिकेटपटूचा जर सामन्यावेळी वाढदिवस असेल, तर तो येथे साजरा केला जातो.
काय काय गोष्टी ड्रेसिंग रुममध्ये घडतात?
ड्रेसिंग रुममध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना सामन्यासाठी तयार व्हायला जागा असतात. खेळाडू हॉटेलवरुन मैदानात येताना सामन्यासाठी तयार होऊन आलेले नसतात. ते ड्रेसिंग रुममध्ये आपले कपडे बदलतात. तसेच वेगवेगळ्या रॅकमध्ये आपले साहित्य व्यवस्थित ठेवतात. याच ड्रेसिंग रुममध्ये फ्रेश होण्यासाठी खेळाडूंना बाथरुमचीही सोय केलेली असते. तसेच काही ड्रेसिंग रुममध्ये टीम मिटींगसाठी व्यवस्था केलेली असते.
ड्रेसिंग रुम शेजारी जेवण, पाणी यांची खेळाडूंसाठी व्यवस्था केलेली असते. तसेच येथे चालू सामन्याच्या रॉ फूटेजचे प्रक्षेपण होत असते. त्यात समालोचन किंवा जाहीराती दाखविल्या जात नाहीत. याला कारण म्हणजे त्या समालोचनाचा खेळाडूंवर सामन्यादरम्यान कोणताही परिणाम होऊ नये. सध्याच्या काळात ड्रेसिंग रुममध्ये प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफला सामन्याच्या ऍनालिसीससाठी लॅपटॉपही ठेवलेले असतात. व्हिडीओ ऍनालिस्टसाठी खास सोय केलेली असते. तसेच संघाबरोबर जे फिजीओ जातात, त्यांना खेळाडूंची मसाज करण्यासाठीही येथे व्यवस्था केलेली असते.
बऱ्याच वेळा विरोधी संघाची ड्रेसिंग रुम देखील संघाच्या शेजारीच असते. परंतु त्यांना सामना सुरु असताना एकमेकांना तेथे भेटता येत नाही.
ड्रेसिंग रुममध्ये बरेच किस्से घडतात. जे पुढे लोकप्रियही होतात. काही किस्से हे चांगले असतात तर काही वाईट. अनेक क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याच ड्रेसिंगरुममधील किस्से सांगत असतात. कधी कधी ड्रेसिंगरुममध्ये जे होते, त्यातील खरे कधीही प्रेक्षकांसमोर येत नाही. अगदी कधी कधी क्रिकेटर एकमेकांशी येथे हाणामारीही करतात. कधी कधी बाद झाल्यावर याच ड्रेसिंग रुममध्ये आपल्या बॅटने राग काढला जातो. परंतू ड्रेसिंग रुम याला कधीही विरोध करत नाही. ड्रेसिंग रुम ही जेवढी क्रिकेटपटूंसाठी जवळची असते तेवढीच ती प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय असते. उगीच नाही ड्रेसिंग रुमच्या शेजारच्या स्टॅंडची तिकीटं महागडे असतात.
ड्रेसिंग रुम सिक्रेट्स मालिकेतील वाचनिय लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते