आंतरराष्ट्रीय क्रिकेट ३ प्रकारे खेळले जाते. ते म्हणजे, कसोटी क्रिकेट, वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेट होय. क्रिकेटच्या टी२० या लहान प्रकारात एकीकडे फलंदाज चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करतो, तर गोलंदाज फलंदाजांना बाद कसे करता येईल याचा प्रयत्न करतो.
परंतु असेही काही गोलंदाज असतात जे आपल्या षटकात विरोधी संघाच्या फलंदाजांना एक धावही घेऊ देत नाहीत. टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कठीण षटक म्हणजे २० वे षटक. या षटकात सामना पलटण्याची शक्यता अधिक असते.
या लेखात आपण जागतिक क्रिकेटमधील त्या ४ गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी टी२०तील २० वे षटक निर्धाव टाकले आहे आणि फलंदाजाला एकही धाव घेण्यापासून रोखले आहे.
२० वे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज- 20th Over Maiden in T20s
४. मोहम्मद आमिर-
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा (Mohammad Amir) समावेश त्या निवडक खेळाडूंमध्ये होतो, ज्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये २० वे षटक निर्धाव टाकले आहे. २८ वर्षीय डावखुरा गोलंदाज आमिर टी२० क्रिकेटमध्ये डावातील २०वे षटक निर्धाव टाकणारा जगातील पहिला गोलंदाज आहे.
आमिरने हा कारनामा २०१०मधील टी२० विश्वचषका दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केला होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी त्यांनी १९व्या षटकापर्यंत १९१ धावा केल्या होत्या. त्या सामन्यातील शेवटचे २०वे षटक आमिरने टाकले होते. त्यात त्याने एकही धाव न देता निर्धाव षटक टाकले होते.
शेवटच्या षटकात आमिरने ब्रॅड हॅडिन, मिचेल जॉनसन आणि शॉन टेटला बाददेखील केले होते. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला होता. तरीही यानंतर पाकिस्तान संंघाचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये १५७ धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघाने तो सामना ३४ धावांनी जिंकला होता.
३. जनक प्रकाश-
सिंगापूर क्रिकेट संघाचा खेळाडू जनक प्रकाशचाही या यादीत समावेश आहे. मागील वर्षी सिंगापूर आणि कतार संघांमध्ये २०१९ आयसीसी विश्वचषक रीजन फायनल सामना खेळण्यात आला होता. त्या सामन्यात सिंगापूर संघाकडून प्रकाशने डावातील २०वे षटक निर्धाव टाकण्यात विक्रम केला होता.
अंतिम षटकात कतारला विजयासाठी ३४ धावांची आवश्यकता होती. परंतु प्रकाशच्या शानदार गोलंदाजीने कतारला एकही धाव घेता आली नाही आणि ते षटक निर्धाव टाकले गेले. सिंगापूरने तो सामना ३३ धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात जनकने केवळ १५ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या होत्या.
प्रकाशचा तो पदार्पणाचा सामना होता. त्याने आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. त्यात त्याने २१.२९ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या होत्या.
२. जीतन पटेल-
तसं तर न्यूझीलंड संघाच्या क्रिकेटपटूंच्या नावावर अनेक मोठ-मोठे विक्रम आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाचा फिरकीपटू गोलंदाज जीतन पटेलचाही (Jeetan Patel) समावेश आहे. त्याची गणना अनुभवी फिरकीपटूंच्या गोलंदाजांमध्ये केली जाते. जीतनने २००८ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० सामन्यात २०वे षटक निर्धाव टाकले होते.
खरंतर २००८मध्ये विंडीज आणि न्यूझीलंड संघात २ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात आली होती आणि त्यातील दुसरा सामना हॅमिल्टनच्या मैदानावर खेळण्यात आला होता.
त्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे विंडीजसमोर १९२ धावांचे भले-मोठे आव्हान होते. शेवटच्या षटकात विंडीजला विजयासाठी ३७ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जीतनवर सोपविली होती. पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करताना एकही धाव दिली होती. न्यूझीलंडने शेवटी तो सामना ३६ धावांनी जिंकला. त्यात त्याने शेवटच्या षटकात दिनेश रामदीनची विकेटही घतेली.
१. नवदीप सैनी-
भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत. तर नवदीप सैनीचाही (Navdeep Saini) या गोलंदाजांमध्ये समावेश आहे. त्याच्यात एका षटकात सामना पलटविण्याचीही क्षमता आहे.
आयसीसी विश्वचषक २०१९नंंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी सैनीने विंडीजविरुद्ध खेळताना टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मालिकेत पदार्पणाबरोबरच त्याने उत्कृष्ट कामगिरीही केली होती.
कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सैनीवर विश्वास ठेवत त्याच्याकडे सामन्यातील शेवटचे षटक सोपविले. त्यात सैनीने पहिले २ चेंडू निर्धाव टाकले. तिसऱ्या चेंडूवर कायरन पोलार्डला (Kieron Pollard) बाद केले. त्यानंतर पुढील ३ चेंडू ओशन थॉमस खेळण्यासाठी आला. परंतु त्याला एकही धाव घेता आली नाही. या सामन्यात विंडीज संघाने दिलेले ९६ धावांचे आव्हान भारताने ९८ धावा करत पूर्ण केले आणि तो सामना भारतीय संघाने ४ विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
-देशसेवा हीच ईश्वरसेवा! धोनीप्रमाणेच भारतीय सैन्यदलाचा भाग असलेले क्रिकेटपटू
-२००७ विश्वचषकात ‘हा’ भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध होता प्रचंड दबावात