कसोटी क्रिकेटचा विचार केला तर वनडे क्रिकेट हा तसा क्रिकेटचा वेगवान प्रकार. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकं फलंदाजीची संधी मिळते.
यामुळे वनडेत शतकी खेळी करताना फलंदाजाने खेळपट्टी, समोरचा संघ तसेच त्यावेळची परिस्थिती पाहुन फलंदाजी करणे अपेक्षित असते. कधी कधी धावा जमवणे अतिशय कठीण असते. अशा वेळी फलंदाज मैदानावर टिच्चून फलंदाजी करतात व शतकी खेळी करतात.
तर दुसऱ्या बाजूला कधी कधी विरोधी संघातील गोलंदाज फलंदाजाला जखडून ठेवतात. अशावेळी फलंदाज शतक करतो परंतु त्यासाठी तो जास्त चेंडूंचा सामना करतो. थोडक्यात त्याला आपण संथगतीने केलेली फलंदाजीही म्हणू शकतो.
एक मनोरंजक आकडेवारी-
एक खास विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डी विलीयर्सच्या नावावर आहे. एबीने २२८ वनडेत २१८ डावात फलंदाजी करताना २५ शतके आणि ५३ अर्धशतके केली आहेत. ही २५ शतके करताना त्याने कधीही ९९ पेक्षा जास्त चेंडू घेतले नाहीत.
जागतिक क्रिकटमध्ये शतक जसं जवळ येईल तसे बरेच खेळाडू संथ खेळतात. परंतु २५ शतके करताना कधीही ९९ चेंडू पेक्षा जास्त चेंडू न खेळल्यामुळे एक अजब विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.
शाहिद आफ्रीदी तर ३००पेक्षा जास्त सामने खेळून कधीही वनडेत १०० चेंडू खेळू शकला नाही. ९९पेक्षा कमी चेंडूत वनडे कारकिर्दीतील सर्व शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये ईजाज अहमद (१०), शाहीद आफ्रिदी (०६), जाॅनी ब्रेअस्टाॅ (६) आणि जेपी ड्यूमीनी यांचा समावेश आहे.
दुसऱ्या बाजूला संथ किंवा टिच्चून फलंदाजी करत शतकी खेळी करणारे फलंदाज आपण पाहुयात .
भारताकडून वनडेत सर्वात सावकाश शतकी खेळी करणारे ३ खेळाडू- 3 Slowest ODI Centuries by Indian Batsmen
५. सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) आक्रमक खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. पण काहीवेळा त्याने खूप संयमाने खेळी केली आहे. त्यादरम्यान त्याचे शतकही सावकाश झालं आहे. श्रीलंकेविरुद्ध ऑक्टोबर २०००मध्ये त्याने १४० चेंडूत शतक केलं होतं. जे त्याच्या करकीर्दीतील सर्वात संथ गतीने केलेले शतक होते. श्रीलंकेविरुद्धचे हे त्याचं शतक संघाच्या कामी आलं नाही. कारण भारत हा सामना पराभूत झाला होता.
याव्यतिरिक्त बांगलादेशविरुद्ध खेळताना १४१ चेंडूत त्याने आपलं शंभराव शतक केलं होतं. या सामन्यात सचिनने १४७ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. हा सामनाही भारत पराभूत झाला होता.
४. रवी शास्त्री
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक व माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांनी दोन वेळा ७१पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटने शतकी खेळी केल्या आहेत.
त्यांनी १९८४मध्ये कटक येथे झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात १४२ चेंडूत १०२ धावांची खेळी केली होती. पुढे हा सामना भारतीय संघ एका धावेने पराभूत झाला होता.
रवी शास्त्रींनीच १९९० मध्ये नागपुर वनडेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना १४७ चेंडूत १०१ धावांची खेळी केली होती. हा सामना मात्र पुढे भारताने १९ धावांनी जिंकला होता.
३. मोहिंदर अमरनाथ
१९८८ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात फरिदाबाद येथे झालेल्या वनडेत मोहिंदर अमरनाथ यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १४८ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती. अमरनाथ व कपिल देव सोडून या सामन्यात कुणालाही विशेष कामगिरी करता आली नव्हती. हा सामना भारताने पुढे ४ विकेट्सने गमावला होता.
२. विनोद कांबळी
अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या विनोद कांबळीच्या नावाचाही यात समावेश आहे. १९९३ मध्ये जयपुर वनडेत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात कांबळीने १४९ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. यात विनोद कांबळी सोडून फक्त सचिनने ८२ धावांची चांगली खेळी केली होती. हा सामना देखील भारताने ४ विकेट्सने गमावला होता.
१. मनोज प्रभाकर
भारताकडून अतिशय कमी स्ट्राईक रेटने १०० किंवा अधिक धावा करण्याचा विक्रम मनोज प्रभाकर यांच्या नावावर आहे. १९९४मध्ये कानपूर वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना प्रभाकरने १५४ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. यावेळी भारतीय संघ २५७ धावांचा पाठलाग करत होता व शेवटी ४६ धावांनी हा सामना पराभूत झाला.
वाचनीय लेख-
-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे संघ
-डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पहा कोण आहे यष्टीरक्षक
-फॉलोऑन मिळाल्यानंतर कसोटीत शानदार विजय मिळवणारे २ संघ