भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आगमन झाल्यानंतर त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीसाठी त्याची प्रशंसा करण्यात येत आहे. बुमराहपूर्वी भारतीय संघाला अनेक दिग्गज गोलंदाज लाभले. त्या सर्वच गोलंदाजांनी संधी मिळाल्यानंतर भारतीय संघाला एक खास स्थान मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी द्विपक्षीय मालिकेव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमधील अनेक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. आयसीसी वनडे विश्वचषक यातील एक मुख्य आणि मोठी स्पर्धा आहे. भारतीय गोलंदाजांनी यामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
या लेखात आपण भारताच्या त्या गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयसीसी वनडे विश्वचषकात उत्तम गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज बनले आहेत.
वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज- 5 Indian Bowlers with the most wickets in an ODI World Cup
५. झहीर खान
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) कसोटी आणि वनडेत भारतासाठी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २००३च्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात झहीरने मोलाचे योगदान दिले. त्याने त्या विश्वचषकात ११ सामने खेळताना २०.७७ च्या सरासरीने एकूण १८ विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध सुपर सिक्सच्या सामन्यात झहीरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने त्या विश्वचषकात उत्तम कामगिरी केली होती. त्याने अनेक फलंदाजांना पुरते चिंतेत पाडले होते.
४. जसप्रीत बुमराह
सध्याच्या नव्या काळातील दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नियमितपणे चांगली कामगिरी करत आहे. त्याने मागील वर्षी २०१९मध्ये इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषकात विरोधी संघांच्या फलंदाजांना चिंतेत टाकले होता. त्यादरम्यान त्याने ९ सामने खेळताना २०.६१ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघाचे अन्य खेळाडू बुमराहसारखी कामगिरी करण्यात खूप मागे राहिले. नवीन आणि जुन्या या दोन्ही प्रकारच्या चेंडूने बुमराह घातक सिद्ध होत आला आहे.
शेवटच्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी चिंतेचा विषय ठरतो. त्याची वनडेतील १० षटके खास असतात.
३. रॉजर बिन्नी
भारतीय संघाचे माजी दिग्गज गोलंदाज रॉजर बिन्नी (Roger Binny) यांंनी १९८३ विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी ८ सामने खेळताना १८.६६ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची सरासरी बुमराह आणि झहीरच्या सरासरीपेक्षा कमी होती.
२. उमेश यादव
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) आपल्या उत्तम वेगासाठी ओळखला जातो. त्याने २०१५ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियामध्ये धारदार गोलंदाजी केली होती. त्यादरम्यान त्याने ८ सामने खेळताना १७.८३ च्या सरासरीने १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची सरासरी ही झहीर, बुमराह आणि बिन्नी यांच्या सरासरीपेक्षा चांगली होती.
१. झहीर खान
वेगवान गोलंदाज झहीर खानने विश्वचषकात केलेल्या कामगिरीची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमीच आहे. भारतीय संघाला २०११ च्या विश्वचषकात विजेतेपद मिळवून देण्यात युवराज सिंगबरोबर झहीरनेदेखील महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने त्या विश्वचषकात ९ सामने खेळताना १८.७६ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या होत्या. ही कामगिरी आतापर्यंतची भारतीय गोलंदाजाने विश्वचषकात केलेल्या कामगिरीपेक्षा सर्वोत्तम आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.