प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या कारकीर्दीत अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. अव्वल स्थान मिळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा बर्याच गोष्टींचा त्याग करतो. परंतु कोणत्याही भ्रष्टाचारात किंवा मॅच-फिक्सिंगमध्ये सापडल्यावर त्यांची सर्व मेहनत वाया जाते.
असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत ज्यांच्यावर मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आली. अशा टॉप ५ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ ज्यांना मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घातली गेली.
१. अजय शर्मा (Ajay Sharma)
माजी भारतीय क्रिकेटपटू अजय शर्मा यांनी भारतीय संघासाठी खास अशी कामगिरी केली नाही. कारण त्यांनी फक्त एक कसोटी सामना खेळला. त्यात त्यांनी ५३ धावा केल्या. तसेच ३१ वनडे सामन्यात ४२४ धावा केल्या. १९८८ ते १९९३ दरम्यान ३१ वनडे सामन्यात त्यांना १५ विकेट्स घेण्यात यश आले.
अजय शर्मा हे उत्तम फलंदाज होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १२९ सामन्यांत ६७.४६ च्या अविश्वसनीय सरासरीने १००२० धावा केल्या आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी कारकीर्दीत ३८ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली.
पण २००० मध्ये सामना फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे शर्मा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. सट्टेबाजांशी संबंध ठेवल्याप्रकरणी ते दोषी आढळले होते. परंतु २०१४ मध्ये शर्माला मॅच फिक्सिंगच्या सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले.
२. मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar)
माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर हे अष्टपैलू खेळाडू होते. ते एक चांगले डावखुरे फलंदाज आणि प्रभावी मध्यमगती गोलंदाज होते. प्रभाकर यांनी १९८४ ते १९९६ दरम्यान ३९ कसोटी सामन्यात ३२.६५ च्या सरासरीने १६०० धावा केल्या. तसेच १३० वनडे सामन्यात २४.१२ च्या सरासरीने १८५८ धावा केल्या.
त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३९ कसोटी सामन्यात ९६ आणि १३० वनडे सामन्यात १५७ विकेट्सही घेतल्या. बऱ्याच कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये प्रभाकर यांनी सलामीवीराची भमिकाही बजावली.
पण २००० मध्ये प्रभाकरने माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर, श्रीलंका दौर्यादरम्यान वनडे सामन्यासाठी खेळाडूंना अंडरफॉर्म खेळासाठी पैसे दिल्याचा आरोप केला. पण नंतर प्रभाकर यांच्यावर फिक्सिंगमध्ये गुंतल्याचा आरोप ठेवण्यात आला ज्यामुळे त्यांना खेळातून पाच वर्षाची बंदी घालण्यात आली.
३. श्रीसंत (S. Sreesanth)
भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नाही. परंतु त्याने क्रिकेटमध्ये आपला ठसा नक्कीच उमटविला. श्रीसंत आपल्या तापट स्वभावासाठी जास्त प्रसिद्ध होता. परंतु त्याने त्याच्या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना बाद केलं आहे.
२००५ ते २०११ दरम्यान श्रीसंत भारताकडून खेळला. त्याने २७ कसोटी सामने, ५३ वनडे आणि १० टी-२० सामने खेळाला आहे. या वेगवान गोलंदाजाने कसोटीमध्ये ८७ विकेट्स, वनडेत ८५ विकेट्स आणि टी-२० सामन्यात ७ विकेट्स घेतल्या.
धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकला. यामध्ये श्रीशांत भारताच्या विजयी संघाचा सदस्य होता.
आयपीएल २०१३ दरम्यान राजस्थान रॉयल्सकडून खेळताना श्रीसंत आणि अन्य दोन साथीदार अजित चंडिला (Ajit Chandila) आणि अंकित चव्हाण (Ankeet Chavan) यांना स्पधेर्तील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्यावर आजीवन बंदी घातली.
नंतर, ती कालावधी कमी करून सात वर्षे करण्यात आली आहे. श्रीशांत सप्टेंबर २०२० नंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास पात्र ठरेल.
४. अजय जडेजा (Ajay Jadeja)
माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा हा भारतीय वनडे संघातील मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण फलंदाज होता. १९९२ ते २००० या दरम्यान जडेजाने १५ कसोटी आणि १९६ वनडे सामने खेळले आहेत. या फलंदाजाने कसोटीमध्ये २६.१८ च्या सरासरीने ५७६ धावा आणि वनडे मध्ये ३७.४७ च्या सरासरीने ५३५९ धावा केल्या आहेत. त्याने वनडे सामन्यात २० विकेट्सही मिळवल्या आहेत.
कसोटी कारकीर्दीत त्याने चांगली कामगिरी केली नसली तरी जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याने १११ सामन्यात ५४.०० च्या उत्कृष्ट सरासरीने ८१०० धावा केल्या आहेत.
२००० मध्ये जडेजाचा बुकींशी संबंध असल्याच आढळून आलं आणि त्यामध्ये तो दोषी ठरली. त्याला पाच वर्षांसाठी खेळातून निलंबित करण्यात आले. परंतु, २००३ मध्ये त्याची शिक्षा रद्द करण्यात आली. ज्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत जाण्यास पात्र ठरला आणि तो २०१३ पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळाला.
५. मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन हा एक दिग्गज भारतीय फलंदाज आणि यशस्वी भारतीय कर्णधार होता. १९८५ पासून २००० पर्यंत अझरुद्दीनने ९९ कसोटी आणि ३३४ वनडे सामने खेळले आहेत. त्याने या ९९ कसोटी सामन्यात ४५.३ च्या सरासरीने ६२१५ धावा आणि ३३४ वनडे सामन्यात ३६.९२ च्या सरासरीने ९२७८ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत त्याने वनडे मध्ये १२ विकेट्सही घेतल्या आहेत.
१९९२, १९९६ आणि १९९९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकामध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले.
२००० मध्ये हा स्टार भारतीय क्रिकेटपटू सामना-फिक्सिंग घोटाळ्यात सामील असल्याचे समजले. त्याच्यावर सट्टेबाजांशी संबंध जोडल्याचा आणि बुकींना माहिती पुरविण्याचा आरोप होता. अझरुद्दीनवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जेची सट्टेबाजीसाठी बुकींशी परिचय करून देण्याचाही आरोप होता.
परिणामी अझरुद्दीनवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजीवन बंदी घातली. मात्र, २०१२ मध्ये त्याच्यावरील आजीवन बंदी रद्द करण्यात आली.