ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात सध्या ऍशेस मालिका २०२१-२२ सुरु आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेतील अखेरच्या ३ सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १५ जणांचा संघ घोषित केला आहे. त्यांनी हा संघ घोषित करताना कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पहिल्या २ सामन्यांसाठी निवडलेला संघच अखेरच्या तिन्ही सामन्यांसाठी कायम असणार आहे.
त्यामुळे अखेरच्या तिन्ही सामन्यांसाठी संघाचा कर्णधार म्हणून पॅट कमिन्स (Pat Cummins) कायम राहाणार आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्याकडे कायम राहाणार आहे.
दरम्यान, ७२ व्या ऍशेस मालिकेतील (Ashes 2021-22) पहिल्या सामन्यात ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच ऍडलेड येथे होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत देखील ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
मात्र, दिवस-रात्र स्वरुपात खेळला गेलेल्या दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) सहभागी होऊ शकले नाहीत. कमिन्स कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला क्वारंटाईन व्हावे लागले होते, तर हेडलवूड दुखापतीमुळे या सामन्याला मुकला. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथने ऍडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले. पण आता २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून कमिन्स आणि हेजलवूड संघात पुनरागमन करतील.
ऍशेस मालिकेतील तिसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. हा सामना मेलबर्न येथे होणार आहे. त्यानंतर मालिकेतील उर्वरित दोन सामने पुढीलवर्षी म्हणजेच जानेवारी २०२२ मध्ये होणार आहेत. चौथा कसोटी सामना ५ ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान सिडनी येथे आणि पाचवा कसोटी सामना १४ ते १८ जानेवारी २०२२ दरम्यान होबार्ट येथे होणार आहे. पाचवा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच असे होणार आहे की, एका कसोटी मालिकेत २ सामना दिवस-रात्र स्वरुपातील होतील.
ऍशेस मालिकेतील अखेरच्या ३ सामन्यांसाठी असा आहे ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिचेल स्वीप्सन, डेव्हिड वॉर्नर.
महत्त्वाच्या बातम्या –