शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (२५ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड संघात सामना झाला. हा सामना अफगाणिस्तानने तब्बल १३० धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने घेतलेल्या झेलाने सर्वांचेच लक्ष वेधले.
या सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडने झटपट विकेट गमावल्या. दरम्यान, डावातील ५ व्या षटकात अफगाणिस्तानकडून नवीन उल हक गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील त्याने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर स्कॉटलंडच्या मॅथ्यू क्रॉसने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करुन मागे गेला.
त्याचवेळी शहजादने उजवीकडे हवेत सूर मारत चेंडू अचूक टीपला. त्याने हा अप्रतिम झेल घेतल्यानंतर जोरदार सेलिब्रेशनही केले. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे स्कॉटलंडची ही एकमेव विकेट झेलच्या रुपात गेली. स्कॉटलंडच्या अन्य ९ विकेट्स केवळ पायचीत आणि त्रिफळाचीतच्या स्वरुपातील होत्या आणि या ९ विकेट्स मुजीब उर रेहमान आणि राशिद खान या अफगाणिस्तानच्या युवा फिरकीपटूंनी घेतल्या. मुजीबने ५ आणि राशिदने ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकात ६० धावांवर सर्वबाद झाला.
https://www.instagram.com/p/CVdV9dBloVT/
तत्पूर्वी सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी हा निर्णय योग्य देखील ठरवला. अफगाणिस्तानने २० षटकांत ४ बाद १९० धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झाद्रानने ३४ चेंडूत सर्वाधिक ५९ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले.
तसेच रेहमानुल्ला गुरबाजने ४६ धावांची, तर हजरतुल्ला झझाईने ४४ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद शहजादने २२ धावांचे आणि मोहम्मद नबीने नाबाद ११ धावांचे योगदान दिले.
स्कॉटलंडकडून सफियान शरिफने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर, जोश डेवी आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
शमीवर अनावश्यक टीका, राहुल गांधींनाही राहवेना; ट्विट करून साधला निशाणा
स्कॉटलंड नाचले मुजीबच्या तालावर! पाच बळी मिळवत रचले विक्रमच विक्रम