यूएईमध्ये सध्या टी१० लीग खेळली जात आहे. गुरुवारी (२ डिसेंबर) टी१० लीगमध्ये दिल्ली बुल्स आणि टीम अबुधाबी यांच्यात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली बुल्सने टीम अबु धाबीला ४९ धावांनी पराभूत केले. दिल्ली बुल्स संघाचा हा या टी१० लीग हंगामातील सातवा विजय ठरला. दरम्यान, दिल्ली बुल्सने प्रथम फलंदाजी करताना १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरात, टीम अबुधाबी संघ मर्यादित १० षटकांमध्ये ८ विकेट्स नुकसानावर ८६ धावापर्यंत पोहचू शकला. दिल्लीच्या विजयात आदिल राशिदने महत्वाची भूमिका पार पाडली.
या विजयानंतर दिल्ली बुल्स संघ गुणतालिकेत पहिल्या दोन संघांमध्ये सहभागी झाला. टीम अबुधाबीने जर या सामन्यात १०८ धावांचा टप्पा गाठला असता, तर संघ पहिल्या दोन संघांमध्ये दाखल झाला असता. मात्र, टीम अबुधाबीला ही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. टीम अबुधाबीने डावातील पहिल्या २० चेंडूत ४१ धावा करत २ महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही आणि एकापाठोपाठ विकेट्स गमावत गेला. अबुधाबी संघ मर्यादित १० षटकांमध्ये फक्त ८६ धावा करू शकला. परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
इंग्लंड संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आदिल राशिदने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले आणि दिल्ली बुल्स संघासाठी विकेट्सची हॅट्रिक देखील घेतली. त्याने त्याच्या दुसऱ्या षटकात आक्रमक दिसणाऱ्या लियाम लिविंगस्टोनला २९ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर कॉलिन इनग्राम आणि जेमी ओवरटन यांना शून्य धावांवर तंबूत पाठवले. आदिल रशिदने ही हॅट्रिक केल्यानंतर अबुधाबी संघाची मधली फळी उद्धस्त केली. परिणामी, संघ दिल्ली संघाने दिलेले लक्ष्य गाठू शकला नाही.
आदिल राशिद व्यतिरिक्त सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि शेरफेन रूदरफोर्ड यांनीदेखील दिल्ली संघासाठी महत्वाची खेळी केली. या दोघांनी संघासाठी अर्धशतक पूर्ण केले. गुरबाजने २९ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ६९ धावांची तुफानी खेळी केली. तसेच रूदरफोर्डने २२ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.