वनडे क्रिकेटच्या सुरुवातीपासून दीड दशक वेस्ट इंडीजने क्रिकेटच्या त्यावेळच्या नव्या प्रारूपावर अधिराज्य गाजवले. सलग दोन विश्वचषक विजय आणि तिसऱ्या विश्वचषकात अंतिम फेरी असा त्यांचा प्रवास राहिला होता. मात्र, त्यानंतर विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तितकेसे यश मिळत नसले; तरी विंडीजच्या खेळाडूंनी आपल्या खेळाचा पारंपारिक अंदाज बदलला नाही.
त्याचवेळी, २००५ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० क्रिकेटला सुरुवात झाली आणि वेस्ट इंडीज क्रिकेटला सोन्याचे दिवस येऊ लागले. पाहता-पाहता वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी आपल्या बेधडक अंदाजाने क्रिकेटचे हे सर्वात छोटे रूप आपलेसे केले. अवघ्या चार वर्षाच्या काळात दोन टी२० विश्वचषकांवर त्यांनी कब्जा केला. या दोन्ही विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या फिरकीची बाजू ज्याने सांभाळली तो सॅम्युअल बद्री आज (०९ मार्च) एकेचाळीशी गाठतोय.
क्रिकेटर आणि पीटी शिक्षक
सॅम्युअल बद्री हा भारतीय वंशाचा कॅरेबियन नागरिक. अनेक वर्षांपूर्वी भारतातील अनेक लोक कामानिमित्त अमेरिकेच्या आसपासच्या देशांमध्ये स्थायिक झाले. त्यापैकी त्रिनिदाद आणि टोबॅगो देशातील बरॅकपोर येथे बद्रीचा जन्म झाला. कॅरेबियन बेटावरील क्रिकेटची जनुके त्याच्यात जन्मजात होती. इतर सगळे वेगवान गोलंदाजी आणि धुवाधार फलंदाजीचा सराव करत असताना हा पठ्ठ्या लेगस्पिन गोलंदाजी करत. हळूहळू तो वरच्या स्तरावरील क्रिकेटमध्ये निवडला गेला.
बद्रीने २००२ मध्ये आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. मात्र, त्याने त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. वादग्रस्त राहिलेल्या स्टॅनफोर्ड सुपर सिरीज या टी२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, राष्ट्रीय संघाचे दरवाजे त्यासाठी अजूनही बंद होते. याच दरम्यान त्याने प्राथमिक शाळेमध्ये पीटी शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
राष्ट्रीय संघात मिळाली संधी
जवळपास १० वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर बद्रीला राष्ट्रीय संघात संधी मिळाली. वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध चमकदार कामगिरी केल्याने त्याला त्याचवर्षी श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघात स्थान देण्यात आले. या विश्वचषकात त्याने खेळलेल्या चारही सामन्यात पहिले षटक टाकून नवा पायंडा पाडला. त्यावर्षी वेस्ट इंडीजने प्रथमच टी२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.
अल्पावधीत कमावले नाव
आपल्या अत्यंत कंजूस गोलंदाजीने बद्रीने लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. २०१४ साली आपला संघसहकारी सुनील नरीनला मागे टाकत त्याने टी२० गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. २०१६ च्या टी२० विश्वचषक विजेत्या संघातही त्याचा समावेश राहिला. बद्री टी२० क्रिकेटव्यतिरिक्त इतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ५२ सामन्यात ५६ बळी घेताना त्याचा इकॉनॉमी रेट होता ६.७० एवढा किफायतशीर. २०१६ मध्ये खांद्याच्या दुखापतीने त्याला ग्रासले आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला आणि २०१८ मध्ये त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
आयपीएलमध्येही वाजविला डंका
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या २०१३ हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर, पुढील वर्षी तो चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल झाला. २०१७ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅट्रिक घेऊन त्याने आपल्या फिरकीचे कौशल्य दाखवले. तो आपल्या आयपीएल कारकिर्दीत अवघे १२ सामने खेळला ज्यामध्ये त्याला ११ बळी मिळाले तेदेखील ७.४० च्या इकॉनॉमी रेटने. सध्या तो याच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक काम करतो.
आयपीएलव्यतिरिक्त त्याने जगभरात विविध लीगमध्ये खेळून आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्या फलंदाजांचा नाचवले.
न्यूझीलंडचे दिवंगत कर्णधार मार्टिन क्रो लिहितात, ‘मी बद्रीचा खूप मोठा चाहता आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण, मोठ्या मनाने, जिगरबाज आणि एका जागेवर गोलंदाजी करणारा हा पारंपरिक शैलीचा गोलंदाज छोट्या मैदानांवर व जाडजूड बॅट असतानाही इतकी किफायतशीर गोलंदाजी करतो.’
हा असा वेस्ट इंडीज क्रिकेटचा शक्यतो अखेरचा सर्वात्तम लेगस्पिनर, प्रशिक्षक म्हणून आणखी काही दर्जेदार फिरकीपटू तयार करेल यात शंका नाही.
वाचा –
एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल