जेव्हापर्यंत क्रिकेटपटू क्रिकेट खेळत असतो, तेव्हापर्यंत तो नाव आणि पैसा दोन्ही कमावतो. परंतु, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंचे नाव तर टिकून राहते. पण पैसे कमावण्यासाठी त्यांना दुसरा मार्गही निवडावा लागतो. काही खेळाडूंना तर, निवृत्तीनंतर त्यांचे जिवन नव्याने सुरु करावे लागते. झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे अनेक खेळाडू निवृत्तीनंतर सामान्य व्यक्तिंप्रमाणे नोकरी करताना दिसतात.
परंतु, क्रिकेट इतिहासात एक खेळाडू असा आहे, जो निवृत्तीनंतर चुकिच्या मार्गाकडे वळला आणि त्याने ड्रग्सची तस्करी करण्यास सुरुवात केली. हा क्रिकेटपटू अजून कोण नसून तो आहे इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ‘ख्रिस लुईस.’
गयाना येथे जन्मलेल्या लुईसने १४ फेब्रुवारी १९९० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. लिसेस्टरशायर, नॉटिंघमशायर आणि सर्रे संघांकडून खेळणाऱ्या लुईसला इंग्लंडचा भावी इयान बॉथम म्हटले जात होते.
फेब्रुवारी १९९३मध्ये चेन्नई येथील भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात लुईसने दुसऱ्या डावात ११७ धावा करण्याचा कारनामा केला होता. ते त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले. परंतु, लुईसचे हे शतक कामी आले नाही. कारण भारताने तो सामना एका डाव आणि २२ धावांनी जिंकला होता. याच सामन्यात पहिल्या डावात सचिनने १६५ आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी १०६ धावांनी खेळी केली होती.
पण, लुईसला पुढे अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३२ सामन्यात ११०५ धावा केल्या. तर, ९३ विकेट्स घेतल्या. तसेच, वनडेत त्याने ५३ सामन्यात फक्त ३७४ धावा आणि ६६ विकेट्स घेतल्या.
मे १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या लुईसने २००८मध्ये सर्वांना चकित केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लुईसने ड्रग्सची तस्करी करण्यास सुरुवात केली. ८ डिसेंबर २००८ला गॅटविक विमानतळावर लुईसला ३.३७ किलो लिक्विड कोकिन सापडल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्याच्याजवळ असणाऱ्या ड्रग्सची किंमत तब्बल १.२६ कोटी इतकी होता. एका ज्यूसच्या बॉटलमध्ये त्याने हे ड्रग्स ठेवले होते.
त्यामुळे २००९मध्ये लुईसला १३ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु, २०१५मध्ये ६ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर लुईसला सोडून देण्यात आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर लुईसने सांगितले, “मी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर माझ्या भविष्याबाबत घाबरलेला होतो. कदाचित यामुळेच मी चुकीचे पाऊल उचलले. मी माझ्या चुकिच्या निर्णयासाठी क्षमा मागतो. मी ६ वर्षे कारागृहात घालवली, ज्याची मी कधीही अपेक्षा केली नव्हती.”
२०१६मध्ये पुन्हा लुईसने क्रिकेट क्षेत्रात पाऊल टेवले. त्याने काउंटी क्रिकेटच्या मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगमध्ये वेंबले क्रिकेट क्लबचे नेतृत्त्व केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-़
मुक्या प्राण्यांची सेवा करतानाचा शिखर धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
अजिंक्य रहाणेकडून वाढदिवसाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचं जोरदार कौतूक
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन