आयपीएल २०२१ च्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. आयपीएल लिलावाची तारीख जाहीर झाल्यामुळे सर्व संघ जोमाने तयारीला लागले आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील असतील. अशातच, इंग्लंडचा प्रमुख टी२० फलंदाज डेव्हिड मलान या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरू शकतो. बऱ्याच संघांना चांगल्या सलामीवीराची आवश्यकता असल्याने त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
मलानवर लागू शकते मोठी बोली
आयपीएल २०२१ साठीचा मिनी लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडेल. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स या संघांना एका दर्जेदार सलामीवीराची आवश्यकता आहे. त्यामुळे हे संघ इंग्लंडचा डेव्हिड मलानवर मोठी बोली लावू शकतात. मलान यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये सहभागी झाला नाही. सध्या मलान फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे, सर्व संघ त्याला आपल्या ताब्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करतील.
सातत्यपूर्ण कामगिरी करतो मलान
आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीत प्रथमस्थानी असलेला मलान सातत्यपूर्ण कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. अगदी कमी कालावधीत तो टी२० क्रिकेटचा मोठा खेळाडू बनलेला दिसून येतो. आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत अवघे १९ सामने खेळलेल्या मलानच्या नावे ८५५ धावा आहेत. तर, त्याची सरासरी ५३.४३ अशी अफलातून आहे. मलानने ट्वेंटी ट्वेंटी कारकिर्दीत आत्तापर्यंत ६११७ धावा काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० सोबत सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये देखील तो चांगली कामगिरी करतोय.
अचानक चर्चेत आला होता मलान
डेव्हिड मलान टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचल्यानंतर चर्चेत आला होता. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९०० पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवणारा तो दुसरा फलंदाज ठरलेला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने ९०० रेटिंग गुण मिळवण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र
‘या’ भारतीय खेळाडूची कामगिरी ठरवेल भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा विजेता?, इंग्लंडच्या दिग्गजाचे भाकीत