क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करण्याची गोष्ट नवीन नाही. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणार आपले नशीब आजमावले आहे. यात अनेकजण यशस्वी ठरले तर अनेकजण अयशस्वीही ठरले.
पाकिस्तानात इम्रान खान यांनी विश्वचषक विजेते कर्णधार ते पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान असा प्रवास केला आहे. भारतात नवज्योत सिंग सिद्धू, किर्ती आझादसह अनेक खेळाडू राजकारणात आहेत तर भारतीय उपखंडातील श्रीलंकेतच अर्जून रणतुंगा हे माजी कर्णधार राजकारणात आहेत.
या लेखात अशाच क्रिकेट कारकिर्दीबरोबरच राजकारणातही पाऊल ठेवलेल्या ११ खेळाडूंचा संघ तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सलामीवीर – गौतम गंभीर, नवज्योत सिंग सिद्धू
गौतम गंभीर (सलामीवीर)
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने २०१८ ला निवृत्ती घेतल्यानंतर मागीलवर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवले. त्याला मागीलवर्षी लोकसभा निवडणूकीत उत्तर दिल्लीमध्ये भाजपकडून उमेदवारीही मिळाली होती. तसेच तो उत्तर दिल्लीत निवडणूकही जिंकला. सध्या तो खासदार आहे.
गंभीर जरी आता पुर्णवेळ राजकारणात असला तरी तो ट्विटर किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यावर कारकिर्दीत जो अन्याय झाला त्यावर तोंडसुख घेत असतो. भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात अतिशय मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या या खेळाडूने राजकारणात प्रवेश करण्यापुर्वी याचे स्पष्ट संकेत त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत दिले होते.
गंभीरने त्याच्या कारकिर्दीत ५८ कसोटी सामने, १४७ वनडे सामने आणि ३७टी२० सामने खेळले आहेत. त्याने एकूण २४२ सामने खेळताना ३८.४५ च्या सरासरीने १०३२४ धावा केल्या आहेत. यात त्याने २० शतके आणि ६३ अर्धशतके केली आहेत.
गंभीर आता राजकारणाची ही कारकिर्द किती गंभीर घेऊन पुढे वाटचाल करतोय हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नवज्योत सिंग सिद्धू (सलामीवीर)
भारताकडून ५१ कसोटी आणि १३६ वनडे सामने खेळताना ७००० पेक्षाही अधिक धावा करणारे माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूकही जिंकली. ते दहा वर्षे अमृतसरमध्ये खासदार होते. २०१४मध्ये त्यांना अमृतसरमधून आपली सीट ही दिवगंत अरुण जेटली यांच्यासाठी सोडावी लागली. पुढे अरुण जेटली येथून पराभूत झाले. एप्रिल २०१६मध्ये त्यांना बीजेपीने राज्यसभा सदस्य केले. परंतु ४ महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
नंतर आप पार्टीच्या मार्गावर असलेल्या सिद्धू यांनी २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काही काळ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. सद्या ते पंजाबमध्ये काॅंग्रेसकडून विधीमंडळ सदस्य आहेत.
मधली फळीतील फलंदाज – सनथ जयसुर्या , नवाब पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, अर्जुन रणतुंगा
सनथ जयसुर्या (तिसरा क्रमांक, अष्टपैलू)
श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसुर्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २० हजारांहून अधिक धावा आणि ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याची जगातील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होती. त्याने निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. तो श्रीलंकेत त्याच्या मातारा जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आला होता.
२०१३ मध्ये त्याची श्रीलंकेच्या निवड समितीच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती. पण मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर आयसीसीने कोणत्याही क्रिकेटसंबंधीत कार्यक्रमात भाग घेण्यासाठी २ वर्षांची बंदी घातली. भ्रष्टाचार विरोधी समितीला चौकशी करण्यात त्याने सहाय्य न केल्यामुळे आयसीसीने ही बंदी घातली. गेल्याच वर्षी एक व्हिडीओ समोर आल्यावरही जयसुर्या चांगलाच चर्चेत आला होता.
नवाब पतौडी
भारताचे माजी दिग्गज कर्णधार मन्सौर अली खान पतौडी हे भारताचे पहिले क्रिकेटपटू होते ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि निवडणूकही लढवली. ते हरियाणातील भिवंडी आणि मध्यप्रदेशमधील भोपाळमधून असे २ वेळा लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहिले. त्यांच्यासाठी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी आणि भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी प्रचार देखील केला. मात्र ते पराभूत झाले. अखेर त्यांनी नंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता.
१९९१मध्ये जेव्हा ते भोपाळमधून काॅंग्रेसकडून लोकसभेची निवडणुक पराभूत झाले तेव्हा त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण हे रामजन्मभूमी चळवळ हे ठरले होते. तेव्हा पराभूत उमेदवरांमध्ये ते एकमेव असे उमेदवार होते ज्यांचे डिपाॅझिट जप्त झाले नव्हते. त्यांच्याबरोबर पराभूत झालेले स्वामी अग्निवेश पुढे बीजेपीकडून खासदार झाले.
पतौडी यांनी भारताकडून ४० कसोटीत सामन्यात नेतृत्त्व करताना ९सामने जिंकले तर त्यांच्या नेतृत्वाखाली १९ पराभव व १२ अनिर्णित सामने टीम इंडियाच्या पदरात पडले. त्यांचे वडिल इफ्तिकार अली खान पतौडी देखील भारताचे कर्णधार राहिले होते. इफ्तिकार अली खान पतौडी इंग्लंड व भारताकडून क्रिकेट खेळलेले ते एकमेव क्रिकेटपटू होते.
त्यांच्या नावाने २०१३पासून दरवर्षी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात एक खास भाषण ठेवलेले असते. ज्याची क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा होते.
मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार)
भारताकडून ३३४ वनडे आणि ९९ कसोटी सामने खेळलेला माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी २००९ मध्ये उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधूम लोकसभा निवडणूही लढवली होती आणि ती जिंकून ते खासदारही झाले होते. पण २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राजस्थानमधून त्यांचा पराभव झाला. २०१४मध्ये अझर राजस्थानमधून लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक नव्हते.
अझरुद्दीनसारखाच खासदारकीचा प्रयत्न काॅंग्रेसने माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला घेऊन उत्तरप्रदेशमधून केला होता. परंतु तो देखील अपयशी ठरला.
तसेच त्यांची २०१८च्या दरम्यान तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. ते सध्या हैद्राबाद क्रिकेेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
अर्जुन रणतुंगा
१९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंका संघाचे कर्णधार अर्जूना रणतुंगा यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत १२ हजारांहन अधिक धावा केल्या आहेत. त्यांनी २००० ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारण्यात मैदानात प्रवेश केला. रणतुंगा श्रीलंकेच्या फ्रीडम पक्षामध्ये सामील झाले आणि २००१ मध्ये त्यांनी कोलंबोमधून लोकसभा निवडणुक लढवली. त्यांची २००४ ला उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक प्रोत्साहन उपमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची बंदरे व जहाजबांध मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती.
हसन तिलकरत्ने (यष्टीरक्षक )
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज हसन तिलकरत्ने देखील अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे राजकाराणाच्या मैदानात उतरला होता. त्याचा १९९६ च्या विश्वविजेत्या संघातही समावेश होता. त्याने ८३ कसोटी आणि २०० वनडे सामने खेळले आहे. निवृत्तीनंतर त्याने युनायटेड नॅशनल पार्टीमध्ये सामील होत राजकारणाचा मार्ग स्विकारला. कोलंबोमधील एव्हीसावले मतदारसंघासाठी पक्षाच्या संयोजक म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. तो अजूनही राजकारणात सक्रिय आहे.
हसन तिलकरत्ने यांना श्रीलंका क्रिकेट संघाला एकेकाळी दादा संघ करण्यातील चिफ आर्किटेक्ट म्हटले जाते. २००४मध्ये त्सुनामीने जेव्हा लंकेतील मैदानांचे नुकसान झाले तेव्हा अर्जुन रणतुंगा हे श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष होते. यावेळी अनेक समित्यांवर हसन तिलकरत्ने यांची वर्णी लागली व त्यांनी ही मैदाने दुरुस्त करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. २००८मध्ये या महान खेळाडूला Maryleborne Cricket Club (MCC) चे अजीवन सदस्यत्व देण्यात आले. तर २०११मध्ये याच खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते.
१९९६ विश्वचषक विजेत्या श्रीलंकन संघाच्या याच हिरोची दोन्ही मुले विविध वयोगटात श्रीलंका संघाकडून क्रिकेट खेळतात.
इम्रान खान (अष्टपैलू)
पाकिस्तानचे महान माजी कर्णधार इम्रान खान हे तर सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. १९९२ चा विश्वचषक पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे. या विश्वचषकानंतर इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आणि राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९९६ ला पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ या रायकीय पक्षाची स्थापना केली. याच पक्षाने २०१८ ला निवडणूकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने इम्रान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
तब्बल २२ वर्ष इम्रान खान यांनी यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्यावर या काळात अनेक वादही ओढवले. जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा घरी जाताना त्यांच्या गाडीत तेच गाणे सुरु होते जे ते १९९२ विश्वचषक जिंकल्यावर तेव्हाचे विश्वचषकाचे थीम साॅंग म्हणून वाजवले होते.
क्रिकेटपटूने राजकारणात आजपर्यंत भुषविलेले हे सर्वोच्च पद आहे. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ८८ कसोटी सामन्यात ३८०७ धावा आणि ३६२ विकेट्स तर वनडेत १७५ सामन्यात ३७०९ धावा आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाज – सर्फराज नवाझ, सर वेस हॉल, मर्शफी मोर्तझा
सर्फराज नवाझ
इम्रान खान व्यतिरिक्त पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सर्फराज नवाज यांनी देखील राजकारणात कारकिर्द घडवली. रिव्हर्स स्विंगच्या कलेची जगाला ओळख करुन देणाऱ्या सर्फराज यांनी १९६९ ते १९८४ दरम्यान १०० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना २४० विकेट्स घेतल्या आहेत.
त्यांनी १९८५ मध्ये झालेल्या निवडणुका जिंकून संसदेचे सदस्यत्व मिळवले आणि तीन वर्षे या जागेसाठी काम केले. २०११ मध्ये त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी सोडल्यानंतर ते मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट पक्षात सामील झाले.
सर वेस हॉल
वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज सर वेस हॉल यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ४८ कसोटी सामने खेळताना १९२ विकेट्स घेतल्या. त्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. सध्या ८२ वर्षांचे असलेल्या हॉल यांनी बार्बाडोस सिनेट आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी काम केले आहे. तसेच १९८७ मध्ये ते बार्बाडोसचे पर्यटनमंत्री झाले. २०१२ मध्ये त्यांचा खेळासाठी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल नाईटहूड (सर) या उपाधीने सन्मानित करण्यात आले.
मश्रफी मोर्तझा
बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मोर्तझा हा राजकारणात प्रवेश करणारा पहिला सक्रिया क्रिकेटपटू आहे. त्याने नरैला -२ मतदारसंघातून अवामी लीगकडून निवडणूक लढवली होती. यात तो विजयी झाला. त्यामुळे तो सध्या खासदार आहे. ज्या मतदार संघातून तो निवडूण आला त्याच नरैला मतदार संघावरुनच त्याला ‘नरैला एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवरापेक्षा त्याला ३४ पट जास्त मते तेव्हा मिळाली होती.
२०१८मध्ये खासदार झाल्यानंतर तो २०१९मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक खेळला होता. खासदार असताना विश्वचषक खेळणारा तो जगातील पहिलाच खेळाडू होता. परंतु ८ सामन्यात या खासदाराला केवळ १ विकेट घेता आली.
त्याने बांगलादेशचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केले असून तो बांगलादेशचा सर्वात यशस्वी कर्णधारही आहे. त्याने ११७ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील ६१ सामन्यात विजय मिळाला आहे. तर ५३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याने आत्तापर्यंत ३१० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात ३९० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क ५व्या स्थानावर
एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू
एका टी२० सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे ५ फलंदाज