इंग्लंडचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. इंग्लंडने नुकताच वेस्ट इंडिज दौरा पूर्ण केला. याच दौऱ्यात संंघाने ५ टी२० आणि ३ कसोटी सामने खेळले. याच दरम्यान बेन स्टोक्सच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे समजत आहे. या दुखापतीमुळे आता स्टोक्सच्या गुडघ्याचे स्कॅन केले जाणार आहे.
कर्णधार जो रुट (Joe Root) याच्या नेतृत्वातील इंग्लंडचा कसोटी संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने पराभूत झाला. हा सामना ग्रेनाडामध्ये खेळला गेला होता. या पराभवासोबतच इंग्लंडने कसोटी मालिकाही ०-१ अशा फरकाने गमावली. अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) या मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण ९९ षटके गोलंदाजी केली.
इंग्लंडचे आगामी काळातील वेळापत्रक व्यस्त आहे. उन्हाळी हंगामामध्ये इंग्लंडला न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका संघांसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच, मागच्या वर्षी भारतासोबतच्या कसोटी मालिकेतील राहिलेला एक सामनाही यादरम्यान खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्टोक्सची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय बनू शकते. माध्यमांतील वृत्तानुसार, जोपर्यंत स्टोक्सची दुखापत किती गंभीर आहे, हे समजत नाही, तोपर्यंत पुढची योजना बनवता येणार नाही.
आता स्टोक्सच्या गुडघ्याचे स्कॅन केले जाणार आहे. स्टोक्सच्या हवाल्याने वृत्तामध्ये सांगितले गेले आहे की, ‘वेस्ट इंडिजमध्ये गुडघ्याचा त्रास होत होता, मी त्याचे स्कॅन करून घेत आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला समजत नाही की, काय होणार आहे, तोपर्यंत कोणतीच योजना बनवता येणार नाही.’ इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेदरम्यान स्टोक्सला साईड स्ट्रेनचा सामना करावा लागला होता. अशात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून गोलंदाजीची अपेक्षा नव्हती, पण तीन कसोटी सामन्यात त्याने ९९ षटके गोलंदाजी केली.
आगामी काळातील व्यस्त कार्यक्रमासाठी आणि वैयक्तिक कसोटी खेळ सुधरवण्यासाठी बेन स्टोक्सने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावातून माघार घेतली होती. आयपीएलऐवजी त्याने डरहम संघासाठी काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मागच्या वर्षीही स्टोक्स त्याच्या हात्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अनेक महिने क्रिकेट खेळू शकला नव्हता. यादरम्यान त्याने मानसिक आरोग्य ठीक नसल्याचेही कारण सांगितले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022| राजस्थानला मोठा धक्का; संघातील ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू १५व्या हंगामातून बाहेर