मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वपदावरुन चर्चा रंगली आहे. सध्या टिम पेन हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि ऍरॉन फिंच हा वनडे व टी२० संघांचा कर्णधार आहे. असे असतानाही संधी मिळाल्यास माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने संघाचे नेतृत्त्व करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्मिथच्या हाती नेतृत्त्वाची सुत्रे देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
यानंतर या चर्चेने वेगळेच वळण घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेते माजी कर्णधार मायकल क्लार्क यांनी पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधार आहे.
फॉक्स क्रिकेटशी बोलताना क्लार्क म्हणाले की, “कमिन्स स्वत: म्हणत नाहीये म्हणून तो ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होण्यास सज्ज नाही असे समजू नका. याचा अर्थ असा होत नाही की तो एक चांगला संघनायक नाही. कमिन्स तिन्ही स्वरुपात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व करण्यास योग्य उमेदवार आहे.”
“स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन सारखे दिग्गज खेळाडू कमिन्सला नेतृत्त्व करण्यास मदत करु शकतात,” असेही क्लार्क यांनी म्हटले आहे.
कमिन्सला देशांतर्गत पातळीवर संघाचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स या देशांतर्गत संघाचा कर्णधार आहे. या संघाकडून त्याच्या नेतृत्त्वाखाली स्मिथ, वॉर्न, मोसेस हेन्रिक्स, स्टार्क, लायन आणि जोश हेजलवुड हे खेळाडू खेळतात.
२७ वर्षीय वेगवान गोलंदाज कमिन्स हा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये ३० सामने खेळताना २९ विकेट्स घेतल्या आहेत. अशात क्लार्क यांच्या वक्तव्यानंतर या शिलेदाराला खरोखरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया संधी देईल का नाही? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेचे वाघ सज्ज! एकाच दिवशी निवृत्त झालेले धोनी-रैना उतरले मैदानात, पाहा खास व्हिडिओ