टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाल्यापासून तेथील क्रिकेटमध्ये एक विचित्र हलचल निर्माण झाली आहे. प्रथम पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी कर्णधार रमीज राजा पीसीबीचे प्रमुख झाले. आता असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानचा एक अनुभवी खेळाडू टी२० विश्वचषकापूर्वीच निवृत्तीची घोषणा करू शकतो. हा दावा पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने केला आहे.
हा खेळाडू स्वीकारू शकतो निवृत्ती
पाकिस्तानचा वरिष्ठ यष्टीरक्षक कामरान अकमल याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अनुभवी अष्टपैलू मोहम्मद हफिज आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर करू शकतो असे म्हटले. अकमल म्हणाला,
“मला वाटते मोहम्मद हफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्वचषकाआधी निवृत्ती जाहीर करू शकतो. माझे त्याच्याशी बोलणे झाले नाही मात्र तो नक्कीच निराश आहे.”
अकमल पुढे म्हणाला,
“पीसीबीने त्याला १८ सप्टेंबरपर्यंत कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्याआधीच त्याला मायदेशी बोलावून घेण्यात आले. या प्रकारामुळे तो नाराज झाला आहे. तो कदाचित विश्वचषकात सहभागी होणार नाही.”
अकमलने यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभाराविषयी नापसंती दर्शवली.
विश्वचषकासाठी झाली आहे हफिजची निवड
पीसीबीने मागील आठवड्यात आगामी टी२० विश्वचषकासाठी आपला संघ घोषित केला. यामध्ये काही अनपेक्षित खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. सध्या चाळीशी गाठलेला पाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू मोहम्मद हाफिज यालादेखील या संघात स्थान दिले गेले असून, माजी यष्टिरक्षक मोईन खान यांचा मुलगा आजम खान याला देखील संघात निवडले गेले आहे. बाबर आझम विश्वचषकासाठी संघाचा कर्णधार असेल. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू हेडन व गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वर्नोन फिलॅंडर संघाला मार्गदर्शन करतील.