भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आगामी काळात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे दोन्ही संघात रंगतदार क्रिकेट पहायला मिळेल, अशी अपेक्षा अनेकांनी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट जगतातातील उच्च दर्जाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याला बाद करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे आव्हान असते. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्याविरुद्ध प्रभावी गोलंदाजी करण्याची योजना भारतीय गोलंदाजाना सांगितली आहे.
स्मिथला बाद करायचे असेल तर..
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तेंडुलकर म्हणाला की, “स्मिथची फलंदाजी करण्याची शैली जरा वेगळी आहे. तो अपारंपरिक शैलीने फलंदाजी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही गोलंदाजांना ऑफ स्टंपला लक्ष्य करून चेंडू फेकायला सांगतो. पण स्मिथ फलंदाजी करताना क्रिझमध्ये हालचाल करतो, त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकावा लागेल.”
चौथ्या आणि पाचव्या स्टंपला करावे लक्ष्य
“स्मिथला बाद करण्यासाठी चौथ्या आणि पाचव्या स्टंपला (काल्पनिक) लक्ष्य करावे लागेल. फक्त याच मानिसकतेने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल.”असेही पुढे बोलताना सचिन म्हणाला.
…तर फलंदाजी करताना स्मिथ चूक करू शकेल
‘शॉर्ट चेंडूचा सामना करण्यासाठी मी तयार आहे’ असे स्मिथ काही दिवसांआधी म्हणाला होता. याबाबत बोलताना सचिन म्हणाला की, “त्याच्याविरुद्ध गोलंदाज आक्रमकपणे गोलंदाजी करेल असे त्याला वाटत असेल. मात्र त्याच्याविरुद्ध ऑफ स्टंपवर किंवा ऑफ स्टंपच्या सभोवताल चेंडू फेकावा लागेल असे मला वाटते, जेणेकरून फलंदाजी करताना तो चूक करू शकेल.”
स्विंगिंग यॉर्कर चेंडू फेकणे हे खेळपट्टीवर असेल अवलंबून
स्मिथविरुद्ध स्विंगिंग यॉर्कर चेंडू प्रभावी ठरू शकेल का?, या प्रश्नाचं उत्तर देताना सचिन म्हणाला की, “चेंडू किती स्विंग होतोयं यावर ही बाब अवलंबून असेल. तुम्ही चेंडूवर लाळेचा वापर करू शकत नाही त्यामुळे परिस्थिती वेगळी असेल. हे खेळपट्टीवरही अवलंबून आहे.”
भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी -20 सामने खेळणार आहे. पहिला वनडे सामना शुक्रवारी(27 नोव्हेंबर) सिडनी येथे होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ खेळाडू करू शकतात विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीची भरपाई, स्टीव्ह स्मिथची भविष्यवाणी
सौरव गांगुलीने साडेचार महिन्यात केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष; मतदानात ‘या’ व्यक्तीने मारली बाजी
ट्रेंडिंग लेख –
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…
वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश