ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज संपन्न झाला. या सामन्यात भारताने ६ गड्यांनी विजय मिळवून टी२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. वनडे मालिकेतील पराभवानंतर टी२० मालिकेतील विजय भारतासाठी दिलासादायक ठरला आहे. ऑस्ट्रेलियावरील या मालिकाविजयाने भारताने सलग ५ टी२० मालिका जिंकण्याची विक्रमी कामगिरी करून दाखवली.
भारताने साजरा केला मालिका विजय
पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ विजयाच्या उद्देशाने आज सिडनीच्या मैदानात उतरला. सिडनीच्या फलंदाजांसाठी मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची मोठी धावसंख्या रचली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. भारताकडून युवा टी नटराजनने २० धावांत दोन बळी मिळवले.
उत्तरादाखल, सलामीवीर केएल राहुल व सलामीवीर शिखर धवनने भारताला वेगवान सुरुवात दिली. भारताने पहिल्या सहा षटकात ६० धावांची लयलूट केली. शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावले. अखेरीस, श्रेयस अय्यर व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी ४६ धावांची भागीदारी करत, भारताला १९५ धावांचे लक्ष्य गाठून दिले. सामनावीराचा पुरस्कार आक्रमक ४२ धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याला देण्यात आला.
भारतीय संघाने केली ही विक्रमी कामगिरी
ऑस्ट्रेलियावरील टी२० मालिकाविजयाने भारताने सलग पाच टी२० मालिका आपल्या नावे करण्याची किमया केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय साजरा केला होता. त्यानंतर मागील वर्षाच्या अखेरीस खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतही भारताने २-१ असा विजय मिळवला.
चालू वर्षीच्या पहिल्याच आठवड्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली. यात भारताला २-० असा विजय मिळाला. मालिकेतील एक सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. भारतीय संघाचे २०२० वर्षातील सर्वात मोठे यश मानले जात असलेल्या, न्यूझीलंड दौऱ्यातील पाचही टी२० सामने जिंकत, भारताने न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’ दिला होता. त्यानंतर, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतही भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
मागील ७ टी२० मालिकांपासून भारतीय संघ आहे अपराजित
भारतीय संघाने खेळलेल्या मागील सात टी२० मालिकात भारतीय संघ अपराजित आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-० असा सफाईदार विजय मिळवला होता. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते. मात्र, यानंतर खेळल्या गेलेल्या सर्व पाचही मालिकांत भारताने विजयश्री प्राप्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धवनने पाडला धावांचा पाऊस; अर्धशतक करत गंभीर, रैनालाही टाकले मागे
अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान
ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर