इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएलचा पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने- सामने असतील. पहिल्या सामन्याच्या आधी एमएस धोनीच्या सीएसकेसाठी चांगले संकेत मिळाले आहेत. १४ कोटी रुपयांना सीएसकेच्या ताफ्यात सामील झालेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर लवकरच संघात पुनरागमन करू शकतो.
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशातील मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याची दुखापत गंभीर असून तो आयपीएलच्या आर्ध्या हंगामासाठी उपस्थित राहू शकणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये होती. मात्र, आता चाहरने स्वतः त्याच्या फिटनेसची माहिती चाहत्यांना दिली आहे. सोमवारी (२१ मार्च) चाहरने सीएसकेचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) ऑनलाईन संवाद साधला. चाहरच्या बोलण्यावरून असे वाटते की, तो पहिल्या किंवा दुसऱ्या सामन्यासाठी सीएसकेच्या ताफ्यात सहभागी होऊ शकतो.
ऋतुराजसोबत बोलताना चाहर म्हणाला की, त्याला अपेक्षा आहे की, तो संघासोबत असेल. दुखापतीवर उपचार आणि विश्रांती मिळण्यासाठी तो सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आहे. दुसरीकडे सीएसकेचा संपूर्ण संघ सुरतमध्ये त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी सराव करत आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या चर्चेचा थोडासा भाग सीएसकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची चिंता नक्कीच थोडी कमी झाली आहे. दरम्यान, चाहरसाठी सीएसकेने मेगा लिलावात तब्बल १४ कोटी रुपये मोजले आहेत आणि तो संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे.
https://www.instagram.com/tv/CbXusiEFjlv/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ ६१ सेकंदाचा आहे. सुरुवातील ऋतुराज हिंदीमध्ये बोलत असतो. त्यानंतर दीपक त्याला इंग्लिशमध्ये बोलायला लावतो. ऋतुराज गायकवाड त्याला विचारतो की, “बंगळुरूमध्ये तू कसा आहेस?” त्यावर उत्तर देताना चाहर म्हणाला की, “चांगला आहे आणि सध्या इथे पाऊस पडत आहे.” त्यानंतर ऋतुराज म्हणतो की, “मला वाटत आहे की, तू इथे असावं.” यानंतर पुढे बोलताना चाहर म्हणाला की, “अपेक्षा आहे असेच होईल आणि पुढच्या काही दिवसात लवकरच भेटू.”