गोवा, दिनांक १७ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) पीटर हार्टलीच्या चुकीमुळे जमशेदपूर एफसीला जवळपास हातात आलेल्या विजयावर पाणी सोडावे लागले होते. पण, भरपाई वेळेत मिळालेल्या पेनल्टी किकने जमशेदपूरला विजयाचे तीन गुण मिळवून दिले.
गतविजेता मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या सामन्यात ग्रेग स्टीवर्ट (९ मि.) व रित्विक दास (३० मि. ) यांनी पहिल्या हाफमध्ये गोल करून जमशेदपूरला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण, दुसऱ्या हाफमध्ये मुंबई सिटीकडून राहुल भेकेने (५७ मि.) पहिला गोल केला. त्यानंतर मिळालेल्या पहिल्या पेनल्टीवर मुंबई सिटीला गोल करता आला नाही आणि याची भरपाई डिएगो मॉरिसिओने (८६ मि. ) पेनल्टीवर गोल करून केली. पण, जमशेदपूरला भरपाईवेळेत मिळालेल्या पेनल्टीवर ग्रेग स्टीवर्टने गोल करून ३-२ असा विजय पक्का केला. या विजयासह जमशेदपूरने २८ गुणांची कमाई करताना तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
३२व्या सेकंदाला जमशेदपूरने जवळपास गोलखाते उघडलेच होते. रिकी लालावमावमाच्या क्रॉसवर बोरिस सिंगने हेडरद्वारे केलेला प्रयत्न क्रॉसबारवरून गेला. बोरिसला ही संधी गमावल्यावर विश्वासच बसला नाही. जमशेदपूरकडून सातत्याने पेनल्टी क्षेत्रात शिरकाव करून गोलची संधी निर्माण करताना दिसले. ९व्या मिनिटाला सुरेख सांघिक खेळ करताना जमशेदपूरने पहिला गोल केलाच… ग्रेग स्टीवर्टने हा गोल करून जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
जमशेदपूरचे आक्रमण थोपवणे मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंना सहज शक्य होत नव्हते. गतविजेत्यांना अक्षरशः जमशेदपूरच्या खेळाडूंनी हतबल केले होते. ३० व्या मिनिटाला डॅनिएल चुक्वूच्या पासवर रित्विक दासने गोल करून जमशेदपूरची आघाडी २-० अशी मजबूत केली. ४३व्या मिनिटाला डॅनिएल चुक्वूचा प्रयत्न मुंबई सिटीचा गोलरक्षक मोहम्मद नवाझने अचूक अडवला. पहिल्या हाफमध्ये जमशेदपूर एफसीने वर्चस्व गाजवले. त्यांच्याकडून ४ ऑन टार्गेट प्रयत्न झाले, तर मुंबईकडून फक्त १ ऑन टार्गेट प्रयत्न झाला.
दुसऱ्या हाफमध्ये मुंबई सिटीने दोन बदल करताना रणनीतीत बदल केला. ५७व्या मिनिटाला त्यांना याचे फळ मिळाले. जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टीपी रेहेनेश यानं मुंबई सिटीकडून झालेला पहिला प्रयत्न रोखला, परंतु चेंडूवर तो ताबा राखू शकला नाही. त्याचवेळेच राहुल भेके योग्यवेळी योग्य ठिकाणी आला अन् मुंबई सिटीसाठी त्याने आजचा पहिला गोल केला. ६९व्या मिनिटाला पीटर हार्टलीकडून पेनल्टी बॉक्समध्ये फाऊल झाला आणि रेफरीने मुंबई सिटीला थेट पेनल्टी दिली. मुंबई सिटीला बरोबरीचा गोल करण्याची याहून सोपी संधी मिळणार नव्हती. पण, आतापर्यंत एकही पेनल्टी किक न गमावलेल्या इगोर अँगुलोला अपयश आले. जमशेदपूरचा गोलरक्षक रेहेनेशने सुरेखरित्या हा गोल अडवला.
८४व्या मिनिटाला पुन्हा एकदा पीटर हार्टलीने पेनल्टी बॉक्समध्ये मुंबई सिटीच्या खेळाडूला पाडले आणि रेफरीने पुन्हा पेनल्टी स्पॉट किक दिली. यावेळेस डिएगो मॉरिसिओने किक घेतली आणि कोणतीच चूक न करता मुंबई सिटीला बरोबरीचा गोल मिळवून दिला. ८८व्या मिनिटाला जमशेदपूरला फ्री किकवर पुन्हा आघाडी घेण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांच्या खेळाडूंना अपयश आले. भरपाईवेळेत आणखी एक पेनल्टी स्पॉट किक रेफरीने दिली, परंतु यावेळेस ती जमशेदपूरच्या बाजूने होती. ग्रेग स्टीवर्टने अचूक गोल करून जमशेदपूरला ३-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
निकाल – जमशेदपूर एफसी ३ ( ग्रेग स्टीवर्ट ९ मि. व ९०+ २ मि. ( पेनल्टी), रित्विक दास ३० मि.) विजयी विरूद्ध मुंबई सिटी एफसी २ ( राहुल भेके ५७ मि., डिएगो मॉरिसिओ ८६ मि. ( पेनल्टी)) .