बीसीसीआयने यावर्षीच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय संघातील २ खेळाडूंची नावांची शिफारस करणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि शिखर धवनचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या अधिका-यांनी या महिन्याच्या अखेरीस पुरुष व महिला गटांसाठी अर्ज भरणे अपेक्षित आहे.
गुजरातचा वेगवान गोलंदाज बुमराह (Jasprit Bumrah) मागील ४ वर्षांमध्ये आपल्या शानदार कामगिरीमुळे सर्वांत सक्षम उमेदवार आहे.
जर बीसीसीआयने (BCCI) पुरुष वर्गामध्ये आणखी खेळाडूंची नावे पाठविली तर त्यामध्ये अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) संधी मिळू शकते. कारण २०१८मध्ये बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस करूनही त्याला हा पुरस्कार मिळाला नव्हता.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “मागील वर्षी, आम्ही पुरुष वर्गातून तीन नावांची शिफारस केली होती. यामध्ये बुमराह, जडेजा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश होता. बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ २ वर्षे पूर्ण केले होते. तर निवडीच्या निकषांप्रमाणे खेळाडूने अव्वल स्तरावर कमीत कमी ३ वर्षे कामगिरी केलेली असावी. त्यामुळे त्याला अर्जुन पुरस्कार (Arjun Award) मिळवता आला नव्हता.”
सूत्राने पुढे सांगितले की, “त्यामुळे बुमराहला नाही तर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) यासाठी निवडले होते. जो बुमराहचा सीनियर खेळाडू आहे. तसेच अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे.”
बुमराहने आतापर्यंत १४ कसोटी सामने, ६४ वनडे सामने आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ६८ विकेट्स, वनडेत १०४ विकेट्स आणि टी२०त ५९ विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे त्याने भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
“बुमराह निश्चितच उत्कृष्ट उमेदवार आहे. तो आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होता. तसेच एकमेव आशियाई गोलंदाज आहे, ज्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमध्ये डावात ५-५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे,” असे एका सूत्राने सांगितले.
याबरोबरच धवनबद्दल बोलायचं झालं तर या पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यामागे त्याचे अनुभवी असणे हेदेखील एक कारण आहे. कारण त्याच्याबरोबरच्या सर्व खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये विराट कोहली, आर अश्विन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
-सर्वाधिक वेळा पार्टनरला धावबाद करत तंबूचा रस्ता धरायला लावणारे फलंदाज
-तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा