दक्षिण आफ्रिका संघ १३ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला असून दोन्ही संघात कराची येथे पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (२८ जानेवारी) तिसरा दिवस चालू आहे. यादिवशी तिसऱ्या सत्राखेर दक्षिण आफ्रिका संघाने १ बाद १६८ धावा फलकावर नोंदवल्या आहेत आणि १० धावांनी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रबाडाने ठरला दक्षिण आफ्रिकाचा पहिलाच गोलंदाज
रबाडाने पाकिस्तान संघाच्या पहिल्या डावात ७० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यात पाकिस्तानचा सलामीवीर इमरान बट्ट, आबिद अली आणि हसन अली यांचा समावेश आहे. यासह रबाडाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका कसोटी संघाकडून सर्वात कमी वयात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आणि २४८ दिवसांचे असताना त्याने हा कारनामा केला आहे.
याबाबतीत रबाडाने आपला संघसहकारी डेल स्टेन याला पिछाडीवर सोडले आहे. स्टेनने २६ वर्षे ३५० दिवसांचे असताना कसोटी कारकिर्दीतील २०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
या विक्रमात पाकिस्तानी दिग्गज अव्वलस्थानी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात २०० विकेट्स घेण्याच्या बाबतीत रबाडाचा चौथा क्रमांक लागतो. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हे या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहेत. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी २६ दिवसांचे असताना २०० कसोटी विकेट्स घेत पहिले स्थान पटकावले होते. तर भारतीय दिग्गज कपिल देव आणि हरभजन सिंग अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. तसेच इंग्लंडचे माजी दिग्गज इयान बॉथम हे पाचव्या स्थानावर आहेत.
सर्वात कमी वयात २०० कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज-
२४ वर्षे २६ दिवस- वसीम अक्रम
२४ वर्षे ६८ दिवस- कपिल देव
२५ वर्षे ७४ दिवस- हरभजन सिंग
२५ वर्षे २४८ दिवस- कागिसो रबाडा
२५ वर्षे २८० दिवस- इयान बॉथम
Kagiso Rabada youngst South African fast bowler to picked 200 Test Wickets and 4th World wide of Of All Time. What an Achivement, Kagiso Rabada. Brilliant. #PAKvsSA pic.twitter.com/vmRweSo8E5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 28, 2021
पहिल्या डावात पाकिस्तानची जबरदस्त सांघिक कामगिरी
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात यजमान संघाने अप्रतिम कामगिरी केली. पाकिस्तानी गोलंदाज यासिर शाह (३ विकेट्स), शाहिन आफ्रिदी (२ विकेट्स) आणि नुमान अली (२ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकाचे खेळाडू २२० धावांवर गारद झाले. दक्षिण आफ्रिकाकडून सलामीवीर डिन एल्गार याने सर्वाधिक ५८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम याने झुंजार शतक करत संघाचा पहिला डाव ३७८ धावांंवर पोहोचवला. २४५ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०९ धावांची खेळी केली. त्याबरोबरच फहीम अश्रम याने ६४ आणि अझहर अली याने ५१ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया
आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र