शनिवार रोजी (०१ मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे तुल्यबळ संघ आमने सामने आले होते. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात शेवटी मुंबईने ४ विकेट्सने विजयी पताका झळकावली. मुंबईचा फलंदाजी अष्टपैलू कायरन पोलार्ड हा या विजयाचा नायक ठरला. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह त्याने एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. त्यांनी निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २१८ धावा केल्या होत्या. दरम्यान पोलार्डने २ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यातही या दोन्ही विकेट्स त्याने एकाच षटकात मिळवल्या होत्या. डावातील १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने फाफ डू प्लेसिसला जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केले होते. त्यापुढील चेंडूवर सुरेश रैना कृणाल पंड्याच्या हाती झेल देत बाद झाला होता.
याबरोबरच चेन्नईच्या २१९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्यातही पोलार्डचा मोलाचा वाटा राहिला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. या खेळीसाठी त्याने ८ षटकार आणि ६ चौकार मारले होते.
फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे तो ‘मॅन ऑफ द मॅच’ अर्थात ‘सामनावीर’ ठरला. यासह मुंबई विरुद्ध चेन्नई या हाय व्होल्टेज सामन्यात सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. त्याच्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांचा क्रमांक लागतो. ते प्रत्येकी ३ वेळा मुंबई-चेन्नई सामन्यात सामनावीर राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई विरुद्धच्या सामन्यात फाफ डू प्लेसिसची ‘ती’ एक चूक चेन्नईला पडली सर्वात महागात?
मानलं पोलार्ड तात्याला! मुंबईने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल