भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना अत्यंत रोमांचक ठरला. पहिल्या डावात आघाडी मिळवल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या २०० धावांवर रोखला. यामुळे भारताला हा ऐतिहासिक सामना जिंकण्यासाठी अवघ्या ७० धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी मिळून ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य पूर्ण केले आणि ८ विकेट्सने ऐतिहासिक विजय नोंदवला. यामुळे भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.
रहाणे-गिलच्या अर्धशतकी भागिदारीचे मोठे योगदान
ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या सहा षटकापर्यंतच भारताने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. असे असले तरी, पदार्पणवीर शुबमन गिल आणि भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला.
युवा सलामीवीर गिलने ९७.२२च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. यात त्याच्या ७ चौकारांचा समावेश होता. सोबतच अनुभवी फलंदाज रहाणेने ४० चेंडूंचा सामना करत ३ चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. अशाप्रकारे त्यांच्या ६१ धावांच्या भागिरादीने भारताला ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाला चितपट करण्याची ही एकूण ८ वी तर गेल्या २० वर्षातील ५ वी वेळ होती.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची पाचवी वेळ
गेल्या २० वर्षांपासून भारताने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण २४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील पहिल्या २३ सामन्यात अवघ्या चार सामन्यात भारताला विजयी पताका झळकावता आली होती. मात्र ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना जिंकत भारताने अजून एका विजयाची भर पाडली आहे. तर तब्बल १२ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले आहे आणि उर्वरित ६ सामने अनिर्णित राहिले आहेत.
अशाप्रकारे भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या २० वर्षात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिका संघ ५ कसोटी विजयांसह या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियात आतापर्यंत १५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ५ सामन्यात विजय तर ७ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. उर्वरित ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंड संघ तिसऱ्या आणि न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी अनुक्रमे ४ आणि १ कसोटी सामने जिंकले आहेत.
गेल्या २० वर्षात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे संघ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामने १५, विजय ५, पराभव ७, अनिर्णित ३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामने २४, विजय ५, पराभव १२, अनिर्णित ६
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामने २३, विजय ४, पराभव १२, अनिर्णित ६
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामने १५, विजय १, पराभव १०, अनिर्णित ४
महत्त्वाच्या बातम्या-
सिराजचा नेम चुकला अन् चेंडू सरळ सीमारेषेपल्याड, बघा कशा मिळाल्या कांगारूला एक्स्ट्रा धावा