इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने अतिशय खराब कामगिरी केली. या संघाला 14 सामन्यांपैकी फक्त 6 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यांमध्ये धोनीने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच निराश केले. मध्यंतरी एका सामन्यात तो शारीरिक समस्येशी झुंजताना दिसला. या सर्व गोष्टी लक्षात घेता 39 वर्षीय धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? या चर्चेला उधाण आले होते. अशातच धोनीने 2021 च्या आयपीएल हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहे. आता माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी धोनीबद्दल एक भविष्यवाणी केली आहे.
लोकं धोनीकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहतात -गावसकर
धोनीच्या कामगिरीविषयी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी एक चमत्कारिक खेळाडू आहे. त्याने फलंदाजी, यष्टीरक्षण आणि नेतृत्व क्षमतांनी सर्वानाच प्रभावित केले आहे. मैदानात आणि मैदानाबाहेरही लोक त्याच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहातात. जितके जास्त आपण त्याला खेळताना पाहतो तितकाच तो आपल्याला चांगला वाटतो.”
…तर धोनी 400 धावा करेल
पुढील हंगामात महेंद्रसिंग धोनी 400 धावा फटकावेल अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे. परंतु, त्यासाठी त्याला घरगुती क्रिकेट खेळावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
पुढील योजनांबद्दल बोलताना गावसकर म्हणाले की, “अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर धोनीने लक्ष केंद्रीत करायला हवं. त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल. कदाचित यावेळी देशांतर्गत क्रिकेट सामने होणार नाही. अशा परिस्थितीत त्याला काही करता येणार नाही. तो जितका जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार, पुढील आयपीएलमध्ये तितकीच चांगली कामगिरी करेल. असे केल्यावर पुढील आयपीएल हंगामात तो निश्चितपणे 400 धावा करेल.”
एमएस धोनीची आयपीएल 2020 मधील कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये धोनीने 14 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 च्या सरासरीने केवळ 200 धावा केल्या आहेत. 47 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती.