भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीने दोन महिन्यांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. त्यानंतर आता तो युएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसत आहे. परंतु निवृत्त झालेला धोनी आता काय करणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे, तेव्हा अशामध्ये धोनीची पत्नी साक्षी धोनीने त्याच्या निवृत्तीनंतरच्या योजनांचा खुलासा केला आहे.
धोनी प्रोड्यूस करणार वेब सीरिज
क्रिकेटला राम राम ठोकलेला धोनी आता नव्या मैदानावर म्हणजेच मनोरंजन जगतात पदार्पण करणार आहे. खरंतर धोनीने २०१९मध्ये त्याने ‘धोनी एंटरटेनमेंट’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस लाँच केले होते. याच्या बॅनरखाली अनेक भाषांमध्ये एक डॉक्युमेंटरी बनवली होती, ज्याने नाव होते ‘रोअर ऑफ द लायन’ आणि कबीर खानने दिग्दर्शित केली होती. त्यानंतर आता धोनीचे हे प्रॉडक्शन हाऊस एक विज्ञानावर आधारित पौराणिक वेब सीरिज बनवणार आहे, ज्यामध्ये धोनीची भागीदारीही असणार आहे. धोनी एंटरटेनमेंटची व्यवस्थापकीय संचालक साक्षी धोनी आहे.
धोनी एंटरटेनमेंट आता एक अशी सीरिज तयार करणार आहे, जी एका लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकाचे रुपांतर आहे. याबाबत धोनीची पत्नी साक्षी धोनीने म्हटले की, सीरिज एक रोमांचक आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना साक्षीने म्हटले की, ती एका अप्रकाशित पुस्तकावर एक वेब सीरिज बनवणार आहे, जी एका युवा लेखकाने लिहिली आहे. या पुस्तकात लिहिण्यात आलेली गोष्ट एका रहस्यमयी अघोरीवर आहे. जो अनेक हायटेक सुविधांसह निर्जन बेटावर राहतो.
साक्षीने पुढे बोलताना सांगितले की, “सध्या यावर काम सुरू आहे आणि ते कास्ट (पात्र) निश्चित करणार आहेत. यासाठी ते लवकरच एक दिग्दर्शकही निश्चित करतील. क्रिएटिव्ह टीम सध्या यावर काम करत आहे.”
“धोनी प्रॉडक्शनच्या ऑपरेशन्सचा भाग असेल आणि वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेईल. त्यामुळे तोच नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी देईल,” असेही साक्षी पुढे बोलताना म्हणाली.
धोनीने आतापर्यंत भारतीय संघाकडून ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. सोबतच टी२०त त्याने ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकूण १६ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.
याव्यतिरिक्त धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.२२ च्या सरासरीने ४४७६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २३ अर्धशतके ठोकली आहेत.