दिल्ली। मुंबई इंडियन्सने शनिवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा ४ विकेट्सने पराभव केला. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय ठरला. या विजयाबरोबरच मुंबईने एक मोठा विक्रमही केला आहे.
मुंबईचा विजय
चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोईन अली (५८), फाफ डू प्लेसिस (५०) आणि अंबाती रायडूच्या (७२*) अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात ४ बाद २१८ धावांचा डोंगर उभा करत मुंबईला २१९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने कायरन पोलार्डने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर अखेरच्या चेंडूवर यशस्वी पूर्ण केला.
मुंबईचा धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय
आयपीएल इतिहासात मुंबईने पहिल्यांदाच २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करत सामना जिंकला आहे. यापूर्वी मुंबईने कधीही २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. याबरोबरच आयपीएलच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. त्यांनी २०२० साली किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (बदललेले नाव – पंजाब किंग्स) २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता त्यांच्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग –
२२४ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह, २०२०
२१९ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, २०२१
२१५ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद, २००८
२०९ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजराज लायन्स, दिल्ली, २०१७
सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ –
मुंबई इंडियन्सने २१९ धावांचा पाठलाग केल्याने आता त्यांचा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये समावेश झाला आहे. आता आयपीएलमध्ये केवळ सनरायझर्स हैदराबाद असा एकमेव संघ राहिला आहे, ज्यांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग पंजाब आणि चेन्नईने केला आहे. या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी २ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यांच्यापाठोपाठ राजस्थान आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आहेत. त्यांनी प्रत्येकी २ वेळा हा कारनामा केला आहे. तर दिल्ली, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबईने प्रत्येकी १ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई विरुद्धच्या सामन्यात फाफ डू प्लेसिसची ‘ती’ एक चूक चेन्नईला पडली सर्वात महागात?
मानलं पोलार्ड तात्याला! मुंबईने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर चाहत्यांकडून भन्नाट मीम्स व्हायरल