मुंबई । येत्या 6 आणि 7 मार्चला सातारच्या तालीम संघाच्या मैदानात रंगणाऱ्या “महाराष्ट्र श्री” राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदाही मुंबईचाच बोलबाला असेल आणि मुंबईचेच खेळाडू या राज्य अजिंक्यपद स्पर्धेवर आपले शिक्कामोर्तब करतील, असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी.
महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मुंबई आणि उपनगरचे प्रत्येकी 17 सदस्यीय तगडे संघ जाहीर करण्यात आले असून यापैकी किमान 15 खेळाडू पदके जिंकतील, असेही सावंत म्हणाले.
आजवर “महाराष्ट्र श्री” च्या जेतेपदावर मुंबईच्याच खेळाडूंचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे यंदा या जेतेपदावर “मुंबई श्री” रसल दिब्रिटो, माजी मुंबई श्री अनिल बिलावासह निलेश दगडे, भास्कर कांबळे, सुशील मुरकर, दिपक तांबीटकर, सुशांत रांजणकरसारखे सुपर फॉर्मात असलेले खेळाडू मुंबईला गटविजेतेपदासह अजिंक्यपदही जिंकून देण्याची क्षमता राखून आहेत.
मुंबई आणि उपनगरचे 24 खेळाडू शरीरसौष्ठवाच्या दहाही गटात धमाका करण्यासाठी सज्ज असून दहापैकी किमान पाच गटात मुंबईचे खेळाडू सुर्वण जिंकून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवतील, असे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी ठामपणे सांगितले.
एवढेच नव्हे तर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारीच्या तोडीची एकही खेळाडू महाराष्ट्रात नसल्यामुळे ती मिस मुंबईपाठोपाठ मिस महाराष्ट्रचा मानही संपादेल. तसेच फिजीक स्पोर्टस् प्रकारातही जेतेपदासाठी मुंबईच्याच रेणूका मुदलियार, दिपाली ओगले, मंजिरी भावसार यांच्यात लढत रंगेल, असाही विश्वास खानविलकर यांनी व्यक्त केला.
“महाराष्ट्र श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवडलेले संघ
मुंबई संघ : अनिल बिलावा, दिपक तांबीटकर, ओंकार आंबोकर, आशिष लोखंडे, सुशील मुरकर, अरूण नेवरेकर, सुजल पिळणकर, निलेश दगडे, उबेद पटेल, अर्जुन कुंचीकोरवे, संतोष भरणकर , सुशांत रांजणकर
फिजीक स्पोर्टस् (महिला) : दिपाली ओगले, पारीख, वीणा चौहान
महिला शरीरसौष्ठव (महिला) : अमला ब्रम्हचारी, रिया कुमार
प्रशिक्षक : प्रसन्न देवरूखकर, व्यवस्थापक : विजय चिंदरकर
मुंबई उपनगर संघ : निलेश कोळेकर, नितीन शिगवण, देवचंद गावडे, प्रितेश गमरे, उमेश गुप्ता, तेजस भालेकर, मनोज मोरे, भास्कर कांबळे, सुजीत महापात्रा, गणेश पेडामकर, नितीन कोळी, रसल दिब्रिटो
फिजीक स्पोर्टस् (महिला) : रेणूका मुदलियार, डॉ. मंजिरी भावसार, सिद्धी ठाकूर
शरीरसौष्ठव (महिला) : डॉ. माया राठोड, श्रद्धा ढोके
प्रशिक्षक : अमोल कांबळी, व्यवस्थापक : अँथनी जोसेफ