विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा हंगाम भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे सुरू होणार आहे. पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. यानंतर आता आगामी हंगामातील गुण पद्धतीत आयसीसी काही महत्वाचे बदल करणार आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोमधील वृत्तानुसार, आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी संघाला १२ गुण देण्यात येणार आहेत. तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना ४-४ गुण देण्यात येणार आहेत. तसेच सामना बरोबरीत सूटल्यास दोन्ही संघांना ६-६ गुण देण्यात येणार आहेत.
याखेरीज षटकांची गती कमी राखल्यास (स्लो ओव्हर रेट) एक गुण कमी करण्यात येणार आहे. प्रत्येक षटकांनुसार एक गुण कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या चिंतेत वाढ होणार आहे. यापूर्वी कसोटी मालिकेनुसार संघाला अंक दिले जायचे. मालिका जिंकणाऱ्या संघाला १२० गुण दिले जायचे. त्यामुळे ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या संघाला तोटा व्हायचा. (New rules for upcoming world test championship)
विश्वविजेता न्यूझीलंड संघासोबत होणार अन्याय
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामात जेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघासोबत दुसऱ्या हंगामात अन्याय होणार आहे. न्यूझीलंड संघाला या हंगामात अवघे १३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर इंग्लंड संघाला २१ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ १९ आणि ऑस्ट्रेलिया संघाला १८ कसोटी सामने खेळणार आहे. तसेच वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघाला १३-१३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर पाकिस्तान १४ आणि बांगलादेश १२ कसोटी सामने खेळणार आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नियमानुसार, एका संघाला तीन मालिका मायदेशात खेळायच्या आहेत तर ३ मालिका परदेशात खेळायच्या आहेत. भारतीय संघ न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. तर त्यांना इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा दौरा करायचा आहे.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी
इंग्लंडमध्ये घोंगावलं जो रूटचं वादळ, अर्धशतक झळकावत ‘या’ विक्रमांत केली रिचर्ड्सची बरोबरी
दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचे कोरोनामुळे निधन, तब्बल १०७ क्रिकेटपटूंची दिली होती साथ