भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने आले आहेत. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलने एकाच डावात १० गडी बाद करत इतिहास रचला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघ मोठी धावसंख्या उभारणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या ६२ धावांवर आटोपला. दरम्यान, न्यूझीलंड संघाच्या फ्लॉप कामगिरी नंतर भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज वसीम जाफर यांनी एक मजेशीर मीम शेअर करत न्यूझीलंड संघाला ट्रोल केले आहे.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतात. ते मजेशीर मीम शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. तसेच मजेशीर रित्या खेळाडूंची पायखेची देखील करत असतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत कु अकाऊंटवरून एक मीम शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
वसीम जाफर यांनी अमिताभ बच्चन यांचा एक फोटो असलेले मीम शेअर केला आहे. ज्यावर लीहले आहे की, “प्रिय न्यूझीलंड, काही दिवस, तर घालवा मुंबईत.” त्यांनी हे मीम शेअर करण्यामागचे कारण असे की, या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंड संघाचा डाव ६२ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय संघाकडे न्यूझीलंड संघाला फॉलोऑन देण्याची संधी होती.
परंतु संपूर्ण ३ दिवसांचा खेळ शिल्लक असल्या कारणाने विराट कोहलीने फॉलोऑन देणे टाळले. यासह मोठी आघाडी देखील घेतली आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाने उभारला ३२५ धावांचा डोंगर
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती, तर अक्षर पटेलने ५२ आणि शुबमन गिलने ४४ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. तर न्यूझीलंड संघाकडून एकट्या एजाज पटेलने १० गडी बाद केले होते.
भारतीय गोलंदाजी समोर किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या
भारतीय संघाने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून काईल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या, तर टॉम लॅथमने १० धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ४ तर मोहम्मद सिराजने ३ गडी बाद केले.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने घेतली मोठी आघाडी
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ६२ धावांवर बाद केल्यानंतर दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल या दोघांनी मिळून प्रत्येकी ४७ धावा केल्या. भारतीय संघाने या डावात ५३९ पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे आणि ५४० धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिलने क्लासिक चौकार मारताच, मैदानात घुमला ‘सचिन…सचिन…’ आवाज; पाहा व्हिडिओ
“मला सिराजमध्ये मॅकग्राची झलक दिसते”; वरिष्ठ भारतीय खेळाडूने गायले गुणगान