प्रो कबड्डी लीगमधील बाराव्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या पुणेरी पलटण संघाचा सामना पवन सेहरावत याच्या नेतृत्वातील बेंगलोर बुल्स संघाशी झाला. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर असलेल्या बेंगलोर संघाने दमदार पुनरागमन करत सामन्यात विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासून काहीशा दुबळ्या समजल्या जाणाऱ्या पुणे संघाने आक्रमक सुरुवात केली. अस्लम इनामदार व मोहित या युवा रेडरने गुण मिळवत पुणे संघाला पुढे ठेवले. मध्यांतरापर्यंत पुणे संघ १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेऊन पुढे होता.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुणे संघाच्या डिफेंडरने गुण घेत आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेंगलोरसाठी युवा रेडर भरत याने गुण घेत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये शांत असलेला बेंगलोर संघाचा कर्णधार पवन सेहरावत फॉर्ममध्ये आला व त्याने पुणे संघाची दाणादाण उडवली. दुसऱ्या हाफच्या १२ मिनिटात बेंगलोरने पुणे संघाला दोन वेळा ऑल आउट केले.
त्यानंतर पुणे संघाच्या डिफेंडरनी संघाला सामन्यात परत आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, रेडरकडून त्यांना सुयोग्य साथ मिळाली नाही. अखेरीस बेंगलोर संघाने सामन्यात ४०-२९ असा विजय मिळवला.