भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यांनतर त्याला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सहभागी होता आले नव्हते. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
रवींद्र जडेजा हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमी काही-ना-काही शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईत दाखल झाला आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ब्रिटनला जाणाऱ्या खेळाडूंना १४ दिवस मुंबईत विलगिकरणात रहाणे आवश्यक आहे.
जडेजाने मुंबईच्या हॉटेलमध्ये हजेरी लावताच एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामधे तो ‘काऊबॉय’ लूकमध्ये दिसून येत आहे. जडेजा या फोटोमध्ये अप्रतिम दिसत आहे. त्याने परिधान केलेल्या लाल रंगाच्या टी शर्टने त्याच्या लुकची शोभा वाढवली आहे. त्याने या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “प्रवासाला झाली सुरुवात, मुंबईत विलागिकरणात.”
जडेजा आपल्या नवाबी थाटासाठी ओळखला जातो. त्यामुळे राजकोटमध्ये त्याच्या घरी घोडे देखील आहेत. अनेकदा त्याने आपल्या घोड्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
रवींद्र जडेजाची कारकीर्द
रवींद्र जडेजाने आपल्या दमदार गोलंदाजी आणि फलंदाजीने भारतीय संघाला तिन्ही स्वरुपामध्ये अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याने भारतीय संघासाठी ५१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजी करताना १९५४ धावा ठोकल्या आहेत. यात १५ अर्धशतक आणि १ शतकाचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना २२० गडी बाद केले आहेत.
यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये त्याने १६८ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याला २४११ धावा करण्यात यश आले आहे. तर गोलंदाजी करताना त्याने १८८ गडी बाद केले आहेत. तर त्याच्या टी-२० कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण ५० सामने खेळले आहेत. यात त्याला २१७ धावा करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ३९ गडी देखील बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक