रविवारी (9 जून) टी20 विश्वचषक 2024 मधील 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. हा महामुकाबला न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेट सत्रादरम्यान जखमी झालाय.
नेट सत्रादरम्यान 37 वर्षीय रोहित शर्माच्या अंगठ्यावर चेंडू लागला. त्यानंतर संघाचे फिजिओ लगेच त्याच्याकडे पोहोचले. फिजिओनं रोहितची तपासणी केली. तपासणीनंतर तो पूर्णपणे बरा असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानं पुन्हा सराव सुरू केला. दिलासादायक बाब म्हणजे, रोहितची ही जखम फारशी गंभीर नाही आणि तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात रोहित शर्मानं 37 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. मात्र चेंडू लागल्यानंतर त्याला 10व्या षटकातच मैदान सोडावं लागलं.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याच्या एका दिवसानंतर आयसीसीनं एक निवेदन जारी केलं. निवेदनात आयसीसीनं म्हटलं की, “नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील आतापर्यंतच्या खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे नाहीत.” आयसीसीनं असंही म्हटलं आहे की, “मैदानाची देखरेख करणारी जागतिक दर्जाची टीम खेळपट्टीच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त आहे, जेणेकरून उर्वरित सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करता येईल.”
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात पाहायला मिळाला आणखी एक लो स्कोअरिंग सामना! बांगलादेशचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका
टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव