‘हिटमॅन’ म्हणून क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असलेला भारतीय फलंदाज म्हणजे रोहित शर्मा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा स्पेशलिस्ट असलेला रोहित मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्येही छाप सोडताना दिसत आहे. परंतु आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत त्याला काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भाष्य केले आहे.
जून १८-२२, या कालावधीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथम्पटनच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी सामन्यांमध्ये ड्यूक चेंडूचा वापर केला जाणार आहे. हा चेंडू जास्त स्विंग करतो. त्यातही इंग्लंडच्या फिरकीस पोषक मैदानांवर चेंडू अधिक स्विंग झाल्यास रोहितला फलंदाजी करणे महाकठीण जाऊ शकते.
याबाबात बोलताना दिनेश लाड म्हणाले की, “रोहित शर्माला खूप लक्ष केंद्रित करुन खेळावे लागणार आहे. इंग्लंडच्या मैदानावर चेंडू जास्त वळण घेत असल्याने त्याला प्रत्येक चेंडू गुणवत्तेच्या आधारवर खेळावा लागणार आहे. नुकत्याच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत फिरकीस पोषक खेळपट्टीवर रोहितने काही शानदार शॉट खेळले होते. याचवेळी बरेचसे दिग्गज फलंदाज संघर्ष करताना दिसले होते. त्यामुळे मला विश्वास आहे की, तो इंग्लंडच्या मैदानांवर त्याच्या खेळीला समायोजित करेल. कोणत्याही क्रिकेटपटूला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये स्वत:ला जुळवून घ्यावेच लागते.”
“इतर देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये चेंडू जास्त स्विंग करतो. याच कारणामुळे रोहितला अडचणींना सामोरे जावे लागेल. परंतु जर त्याने सराव सत्रात दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध सराव केला; तर त्याला खूप फायदा होईल,” असे त्यांनी पुढे म्हटले.
रोहित शर्माची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडत असलेल्या रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत एकूण ११ सामने खेळले आहेत. यात त्याला ६४.३७ च्या सरासरीने १०३० धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळे येणाऱ्या अंतिम सामन्यात रोहित शर्माकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संधीची प्रतिक्षा! तब्बल २३७ विकेट्स अन् १३११ धावा, ‘सौराष्ट्रचा जडेजा’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार
दमदार प्रदर्शनाने कारकिर्दीचं शिखर गाठणारे दिग्गज क्रिडापटू, पुढे मोठ्या चुकीमुळे बनले ‘खलनायक’