शनिवारी पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील ५ व्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांनी इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. तसेच या मालिकेत ३-२ ने विजय देखील मिळवला. दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना होता. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीचे आमंत्रण स्वीकारत भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सामन्याची सुरुवात केली होती.
या सामन्यात विराट आणि रोहितने सलामीला फलंदाजी करताना वैयक्तिक अर्धशतके केली. त्याचबरोबर अर्धशतकी भागीदारी रचली. विशेष म्हणजे भारतीय संघाने या मालिकेत सलामी जोडीमध्ये अनेक बदल करून पाहिले. परंतु कुठल्याही जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर अंतिम टी२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने स्वतः जबाबदारी घेत रोहित शर्मा सोबत मिळून डावाची सुरुवात केली होती.
या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९ षटकात ९४ धावांची भागीदारी केली होती. तसेच या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामी फलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देत रोहित शर्मा म्हणाला, “जर या निर्णयाने संघाला फायदा होत असेल तर मी असे करण्यास तयार आहे. तसेच या प्रकारात मला विराट कोहली सोबत सलामी फलंदाजी करण्यास काहीच त्रास नाही.”
तसेच रोहित पुढे म्हणाला, “या फलंदाजीच्या क्रमवारीने सामना जिंकून खूप आनंद होत आहे. तसेच सर्व काही या गोष्टीवर अवलंबून असेल की कर्णधार त्या विशिष्ठ वेळी काय विचार करत आहे. आम्हाला या गोष्टीचे विश्लेषण करावे लागेल की संघासाठी काय योग्य आहे.”
बाहेर कोण काय बोलत आहे याचा आम्ही जास्त विचार करत नाही – रोहित शर्मा
“मैदानाच्या बाहेर काय होत आहे, याबाबत आम्ही जास्त विचार करत नाही. बाहेर असणारे लोक भलेही कोणाला संघात स्थान द्यावे, कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल याबाबत बोलत असतील. याचा आमच्यासोबत काही एक संबंध नाही. आम्ही अशा खेळाडूंना संघात समाविष्ट करू पाहत आहोत जे चांगली कामगिरी करत आहेत. हे विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे. त्यामुळे आम्ही संघासाठी हाच विचार करत आहोत,” असे रोहित शर्मा म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
युवी..युवी!! स्टेडियममध्ये प्रोस्ताहन देणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ शेअर करत युवराज म्हणाला….
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा करणार लग्नाचा व्हिडिओ लॉन्च, टीझर केला प्रदर्शित
चक्क ११४ मीटरचा षटकार! एमएस धोनीने ठोकलेले ‘हे’ गगनचुंबी षटकार पाहून व्हाल अवाक्