दुबई। बुधवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान शिखर धवनच्या नावावर एक विक्रम झाला.
या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखरने सलामीला फलंदाजीला येत ३७ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएल २०२१ हंगामात ४०० धावांचा टप्पा पार केला. आयपीएलच्या हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची शिखरची ही एकूण आठवी तर सलग सहावी वेळ ठरली.
आयपीएल हंगमात सर्वाधिकवेळा ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता शिखर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. या तिघांनीही ७ वेळा आयपीएल हंगामात ४०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना आहे. रैनाने आत्तापर्यंत ९ आयपीएल हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
शिखरने २०११, २०१२, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ या आठ हंगामात ४०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
शिखरने ४०० धावांचा टप्पा ओलांडलेले हंगाम –
२०११ – ४०० धावा
२०१२- ५६९ धावा
२०१६ – ५०१ धावा
२०१७ – ४७९ धावा
२०१८ – ४९७ धावा
२०१९ – ५२१ धावा
२०२० – ६१८ धावा
२०२१ – ४२२ धावा*
दिल्लीचा एकतर्फी विजय
बुधवारी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून माजी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. तर शिखर धवनने ४२ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रिषभ पंतने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने १७.५ षटकांत २ विकेट्स १३९ धावा करत सामना जिंकला. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही करणार पाकिस्तान दौरा रद्द? बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर
पाकिस्तानसाठी न्यूझीलंडचा दौरा पडला महागात, सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाल्ली २७ लाखांची बिर्याणी
अफगाणिस्तानची टी२० विश्वचषकातून होणार गच्छंती? अजब आहे कारण