भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज मुरली विजय याने सोमवारी (30 जानेवारी) आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारतासाठी 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या क्रिकेट प्रकारांमध्ये मुरली विजयच्या नावावर अनुक्रमे 3982, 339 आणि 169 धावांची नोंद आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी मुरलीचे योगदान मोठे असले तरी मागच्या काही वर्षांपासून तो संघातून बाहेर होता. सोमवारी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय मुरलीने घेतला. (Murali Vijay retirement)
मुरली विजय 12 वीमध्ये अनुउत्तीर्ण झाल्यानंतर स्वत:ला शोधण्यासाठी घर सोडले. त्यानंतर अनेक संघर्षांचा सामना केला. 19 वर्षांखालील तमिळनाडूच्या संघात स्थान न मिळाल्याने त्याने क्रिकेटला गंभीरतेने घेतले. पण आयुष्यात संघर्षच असल्याने त्याला त्याच्या स्टाईलिश राहण्याचे कारणामुळे तमिळनाडूच्या वरिष्ठ संघातही स्थान नाकारण्यात आले. पण या सर्व गोष्टींवर मात करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला. तो म्हणतो जर तूम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायचीच असेल तर ती होतेच. तो खेळाडू म्हणजे मुरली विजय.
मुरली विजय (Murali Vijay) याच्या घरातील वातावरण तसे शिक्षणाला पोषक होते. त्यामुळे मुरलीच्या आई-वडींलांना वाटायचे की त्यानेही थोडं शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं. पण मुरलीचं लक्ष क्रिकेटकडे अधिक होतं. त्याच्या क्रिकेटसाठी त्याला त्याच्या वडीलांची साथही होती. पण तो त्यावेळी क्रिकेटमध्ये कारकिर्द वैगर घडवावी इतकाही गंभीर नव्हता. त्यात त्याची बहीण अभ्यासू तिला बोर्डाच्या परिक्षेत 97-98 टक्के आणि याला मात्र केवळ 40 टक्केच. अखेर जेव्हा मुरली 12 वीला नापास झाला तेव्हा त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी त्याने त्याच्या आई-वडीलांना हे देखील सांगितले की मी जरी घर सोडत असलो तरी मी कोणतेही चूकीचे काम करणार नाही किंवा कोणत्याही वाईट सवयी लावून घेणार नाही. पण असे असले तरी काही वाईट सवयी नंतर लागल्याच, हे देखील त्याने मान्य केले.
घर सोडल्यानंतर त्याने आर्थिक गरज भागवण्यासाठी स्नुकर पार्लरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यातून वेळ मिळेल तसे तो क्रिकेटही खेळत होता. त्यानंतर मात्र त्याने क्रिकेटला गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली होती. तिथे असलेल्या आरबी नावाच्या व्यक्तीने त्याला खूप मदत केली. पण मुरली त्यांना नंतर भेटला नाही. त्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते भेटलेले नाहीत. यादरम्यान त्याने चेन बिझीनेसही केला. त्या सर्व परिस्थितीने त्याला प्रत्येक परिस्थितीत कसे रहायचे हे शिकवले.
त्यानंतर तो पुन्हा त्याच्या शिक्षणाकडे वळला. त्याने चेन्नईमधील विविकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. त्यावेळी मुरली क्लब क्रिकेटही खेळत होता. यादरम्यान त्याला त्याच्या मित्रांचाही मोठा पाठिंबा मिळाला. क्रिकेट खेळण्यासाठी तो वायएससीए आणि आयआयटी क्रिकेट ग्राऊंडमध्ये रात्रही घालवत असे. तिथे त्याला त्याचे मित्र सोबत करायचे. पण असे असतानाही त्याची 19 वर्षांखालील तमिळनाडू संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्याने त्याचे क्रिकेट अधिक गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली. तो त्यानंतर जवळ जवळ मिळतील ते सर्व सामने खेळायला लागला. त्या काळातच त्याच्यातील प्रतिभा भारताचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी हेरली. तसेच त्याचदरम्यान 21 व्या वर्षी त्याचे केस लांब असल्याने त्याला रणजीसाठी तमिळनाडू संघात स्थान नाकारण्यात आले होते. त्यानंतर असे म्हटले जाते त्याला जेव्हा हे समजले त्यानंतर लगेचच संध्याकाळी त्याने त्याचे केस कापले होते.
भारत अरुण यांच्याबरोबरच मुरलीचा एक गमतीशीर किस्साही घडला होता. एकदा मुरली आणि त्याचा मित्र कॉलेजमध्ये फिरत होते. तेव्हा मुरलीला नवीनच सिगारेट ओढण्याची सवय लागली होती. तेव्हा भारत अरुण त्यांच्या गाडीवरुन चालले होते आणि त्याचवेळी मुरलीने नकळत पेटती सिगारेट फेकली. ती अरुण यांच्या जवळून गेली. तेव्हा अरुण काही बोलले नाहीत. पण मुरलीला वाटले आता मागीलवर्षी केस लांब असल्याने संघातील स्थान गेले आता यावर्षी या गोष्टीमुळे जाणार. दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र थेट अरुण यांच्याकडे गेला आणि त्याने माफी मागायला सुरुवात केली. अरुण त्यांना हसून म्हणाले, ठिक आहे, तरुण आहात या चूका होतात. अरुण यांनीच मुरलीला केमप्लास्ट क्लबकडून खेळण्यास सुचवले होते. त्या क्लबमध्ये तमिळनाडूचे माजी क्रिकेटपटू दिवाकर वासू प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीच्या खेळाला पैलू पडत गेले.
मुरलीने या दरम्यानच्या काळात तमिळनाडूच्या 22 वर्षांखालील संघाकडून सीके नायडू ट्रॉफी खेळला. पण या स्पर्धेत त्याला खास कामगिरी करता आली नाही. पण तरीही त्याने हिंमत न हारता अखेर वयाच्या 23व्या वर्षी 2006-07 च्या मोसमासाठी तमिळनाडूच्या रणजी संघात स्थान मिळवले. त्याने पदार्पणाच्या रणजी सामन्यात दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात 59 आणि दुसऱ्या डावात 37 धावा केल्या. पहिल्याच रणजी मोसमात त्याने धावांचा पाऊस पाडला. त्याने 52.33 च्या सरासरीने 2 शतके 1 अर्धशतकासह 7 सामन्यात 628 धावा केल्या. त्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. एवढेच नाही तर त्याने त्या पुढच्या 2007-08 च्या मोसमातही त्याची अशीच दमदार कामगिरी सुरु ठेवली. त्याने या मोसमात 7 सामन्यात 58.20 च्या सरासरीने 582 धावा केल्या. तो चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याची दक्षिण विभाग, भारत अ संघातही निवड झाली.
पुढे त्याने एका रणजी ट्रॉफीच्या सामन्यात अभिनव मुकुंद बरोबर 432 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे त्याला 2008 मध्ये भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. त्याने 2008 ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्या सामन्यासाठी गौतम गंभीरवर आयसीसीने अपशब्द वापरल्याबद्दल बंदी घातली होती. त्यामुळे मुरलीला संधी मिळाली. विशेष म्हणजे तो सौरव गांगुलीचा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. मुरलीनेही ही संधी वाया न घालवता या सामन्यातील पहिल्या डावात 33 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली. तसेच सेहवागसह सलामीला 98 आणि 116 धावांची भागीदारी केली. या सामन्यादरम्यान एक गमतीशीर किस्साही त्याच्याबरोबर घडला. तो शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत होता. तर हरभजन गोलंदाजी करत होता. मुळात तमिळनाडूमध्येच मुरली लहानाचा मोठा झाला असल्याने त्याला हिंदी बोलता येत नव्हते आणि समजतही नव्हते. त्यामुळे हरभजन त्याला गोलंदाजी करताना नक्की काय सांगत होता हे काही कळेना. अखेर हरभजननेच त्याला येऊन विचारले तूला ऐकू येत नाही का? त्यावर त्याने सांगितले तू काय बोलतोय हिंदीमध्ये ते मला काहीच समजत नाही. या सामन्यानंतर मात्र मुरलीने कारकिर्दीत मागे वळुन पाहिले नाही.
पण मुरलीने गंभीर आणि सेहवाग असे संघात नियमित सलामीवीर फलंदाज असताना पुढचा कसोटी सामना जवळजवळ १ वर्षाने खेळला. त्यानंतर तो 2010 आणि 2011 मध्ये कसोटी संघाचा नियमित सदस्य होता. पण तो 2011 ला झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात प्रचंड अपयशी ठरला. त्यानंतर त्याला कसोटीसाठी दीड-वर्ष वाट पहावी लागली. त्याने देशांतर्गत स्पर्धेत आपली चांगली कामगिरी या काळात सुरु ठेवली. अखेर त्याला 2013 ला भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी मिळाली आणि यावेळी त्याने त्याचे पुनरागमन सर्वांच्या लक्षात राहिल याची खबरदारी घेतली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सलग दोन वेळा दिडशतकी खेळी केली. तसेच 1 अर्धशतक केले.
त्याने पुढे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चांगली कामगिरी केली. त्याने 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातही त्याने शानदार कामगिरी करताना 5 कसोटीत 402 धावा केल्या. त्याचवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने 4 सामन्यात 482 धावा केल्या होत्या. मात्र त्याची वनडेतील कामगिरी तितकी बहरली नसल्याने 2015 च्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवता आले नाही. त्याने 2010 ते 2015 या काळात केवळ 17 वनडे सामने खेळले. त्यातही त्याला केवळ 1 अर्धशतक करता आले. पण असे असले तरी तो कसोटी संघाचा २०१८ पर्यंत नियमित सदस्य होता. तो संघाला सुरुवातीचे नवीन चेंडू लिलया खेळत चांगली सुरुवात करुन द्यायचा. त्याची विशेष गोष्ट अशी होती की तो एकदा स्थिर झाला आणि सुरुवात चांगली मिळाली की तो मोठी खेळी करायचा. त्याच चेंडू सोडण्याचं कसबही चांगलं होते. त्याने शिखर धवन बरोबर सलामीला फलंदाजी करताना अनेकदा मोठ्या भागीदाऱ्या रचल्या.
शिखरबरोबर त्याची चांगली मैत्री आहे. शिखर तसा विसराळू खेळाडू. त्याच्याबरोबर एक किस्सा झाला होता. जेव्हा डंकन फ्लेचर यांना नवीनच भारताचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तो वेस्ट इंडिजचा दौरा होता. तेव्हा शिखरने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनडे मालिका खेळली होती आणि आता कसोटी मालिका होती. त्यामुळे मुरलीही वेस्ट इंडिजला पोहचला. तेव्हा फ्लेचर स्वत: विजयशी ओळख करुन घ्यायला त्याच्या रुममध्ये गेले. तिथे शिखरही उपस्थित होता. तेव्हा फ्लेचर यांनी विजयशी ओळख केल्यावर ते निघून गेले. त्यांना निघून गेलेले पाहिल्यावर शिखरने मुरलीलाच विचारले कोण होते ते. त्यावर मुरलीला हसू आवरले नाही. तो म्हणाला अरे तू त्यांच्याबरोबर वनडे मालिका खेळला आहेस ना आत्ताच. तेव्हा शिखरला आठवले अरे ते आपले प्रशिक्षक आहेत.
असो, अनेकदा मुरलीचे महत्त्वाचे टप्पे थोडक्यात हुकले. तो एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 97 वर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 99 धावांवर, 144 धावांवर इंग्लंड विरुद्ध 146 धावांवर, 95 धावांवर असेही शतकाच्या दीड शतकाच्या उंबरठ्यावर उभा असताना तो बाद झाला.
त्याच्याबाबतीत आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनेक खेळाडूंचे जर वनडे कारकिर्द बहरली नसेल तर त्यांची टी-20 कारकिर्दही साधारण तशीच होती. पण मुरली याला अपवाद ठरला भारताकडून टी-20 खेळण्याची त्याला संधी जास्त मिळाली नाही. परंतू त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळताना शानदार कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये 2 शतके केली आहेत. एकदा तो 90 धावांवरही बाद झाला आहे. त्याने 2010 ला चेन्नई सुपर किंग्सने जिंकलेल्या पहिल्या आयपीएल विजयात तसेच त्याचवर्षी झालेल्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. आहे. त्याने 2010 ला 458 धावा आयपीएलमध्ये केल्या होत्या. तर 2011 ला त्याने आयपीएलमध्ये 434 धावा केल्या.
मात्र 2018 ला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या2 कसोटीत त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली. परिणात: त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर मयंक अगरवाल, केएल राहुल, पृथ्वी शॉ अशा युवा खेळाडूंमुळे पुन्हा त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्याबद्दल त्याने जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली.
नेहमी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या गेलेल्या मुरलीला त्याच्या या स्वभावामुळेत मॉन्क हे टोपननाव पडले असे अनेकांना वाटते. पण याबाबतीत त्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता. एकदा १६ वर्षांखालील संघासह तो दिल्लीला क्रिकेट खेळायला गेला होता. तेव्हा दिल्लीची थंडी त्याला सहन होईना. एकदा त्याने त्याच्या संघसहकारी काहीतरी पित असल्याचे दिसला. तेव्हा त्याने विचारले काय आहे, त्यावर तो म्हणाला, यामुळे थंडी वाजत नाही. त्यामुळे मुरली त्याला म्हणाला, अरे मलाही दे. मला ही थंडी सहन होत नाहीये. त्याला नंतर कळाले त्याचा संघसहकारी जे पित होता त्या बॉटलवर ‘ओल्ड मॉन्क’ असे नाव होते.
पण काहीही असले तरी मुरलीने त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेकदा मोठ्या खेळी केल्या. ज्यामुळे अनेकदा भारताच्या उत्तम सलामीवीरांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्याच्या आयुष्यात वैयक्तीक, सामजिक अशी अनेक वादळे आली. सुरुवातीपासूनच संघर्ष करण्याची सवय असलेल्या त्याने त्या प्रत्येक वादळावर मात केली. प्रत्येकवेळी त्याने स्वत:ला सिद्ध केले. मुरली विजय आज आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकत तो एक नवी सुरुवात करण्यासाठी तयार झाला आहे!
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण