कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादवने अर्धशतकासह मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक विक्रमही केला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरल्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक खेळ केला. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. सूर्यकुमारचा हा आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील चौथाच सामना होता. त्याने या ४ सामन्यांतील आत्तापर्यंत ३ डावात फलंदाजी केली आहे. या तीन डावात त्याने १३९ धावा केल्या आहेत.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिल्या ३ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे. गंभीरने त्याच्या पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय टी२० डावात १०९ धावा केल्या होत्या. तर रैनाने ९९ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिल्या ३ डावांत १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे सूर्यकुमार आणि गंभीर हे दोनच भारतीय फलंदाज आहेत.
सूर्यकुमारचे हे आंतरराष्ट्रीय टी२०मधील दुसरेच अर्धशतकही आहे. त्याने कारकिर्दीतील पहिल्या डावातही अर्धशतक झळकावले होते.
भारताने जिंकला सामना
या सामन्यात सूर्यकुमार व्यतिरिक्त भारताकडून कर्णधार शिखर धवनने ४६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६४ धावसंख्या उभी केली. श्रीलंकेकडून दुष्मंता चमिरा आणि वनिंदू हसरंगाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १८.३ षटकांत १२६ धावांवर संपूष्टात आला. श्रीलंकेकडून चरिथ असलंकाने एकाकी झुंज दिली. त्याने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. पण, अन्य फलंदाजांना फार काही करता न आल्याने श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
आता या टी२० मालिकेतील पुढील सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्या गात होता चक्क श्रीलंकन राष्ट्रगीत? व्हिडिओ झाला व्हायरल
पहिल्या टी२० मध्ये मैदानात उतरताच शिखराच्या नावे जमा झाला नकोसा विक्रम; धोनीला सोडले मागे