भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. संघातील खेळाडू हा सामना खेळण्यासाठी मानसिकरीत्या तयार नसल्याचे कारण देत भारतीय संघाने हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता इंग्लंडच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूने भारतीय संघावर ताशेरे ओढले आहेत.
भारताने कसोटी क्रिकेटचा सन्मान केला नाही
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पॉल न्यूमन यांनी इंग्लंडमधील एका वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करताना भारतीय संघाने मॅंचेस्टर कसोटी न खेळण्याचा घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,
“भारतीय संघाने मालिका व कसोटी क्रिकेटचा सन्मान केला नाही. त्यांनी कोरोना नियमावली पायदळी तुडवली.”
न्यूमन यांनी या स्तंभात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निर्णयावर व आयपीएलवर देखील टीका केली. न्यूमन यांच्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय खेळाडूंनी आयपीएलसाठी अखेरची कसोटी खेळली नाही, असे म्हटले होते.
मॅंचेस्टर कसोटीतून भारताची माघार
मॅंचेस्टर येथील पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे, अखेरची कसोटी खेळली जाणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर कसोटी सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, भारतीय खेळाडूंनी संभाव्य धोका न पत्करता कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आले आहेत. ईसीबीने या निर्णयामुळे आपले ३०० पेक्षा अधिक कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी या कसोटीच्या निकालासाठी आयसीसीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केलेली.