इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लडंचा संघ ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील कसोटी सामन्याने इंग्लंडच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे होणार आहेत. या दोन सामन्यांसाठी काहीदिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेदरम्यान काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.
या कसोटी मालिकेत होऊ शकणारे विक्रम –
१. अजिंक्य रहाणे टाकू शकतो एमएस धोनीला मागे –
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये रहाणे एमएस धोनीला मागे टाकू शकतो. रहाणेने ६९ कसोटी सामन्यात ४२.५८ च्या सरासरीने ४४७१ धावा केलेल्या आहेत. यादरम्यान अजिंक्यने १२ शतक झळकावले आहेत. रहाणेने जर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४०६ धावा केल्या तर तो धोनीला मागे पाडू शकतो. धोनीने ९० कसोटी सामन्यात ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केलेल्या आहेत.
२. पॉली उम्रीगर यांनाही मागे टाकण्याची रहाणेला संधी –
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत रहाणे १२ व्या क्रमांकावर आहे. त्याने जर आणखी एक शतक ठोकले तर तो या यादीत उम्रीगर यांना मागे टाकेल.
३. विराट कोहलीला एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी –
मायदेशात झालेल्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाला २१ आणि विराटने २० विजय मिळवून दिले आहेत. अशात कसोटी मालिकेतील २ सामने जरी विराटने जिंकले; तरी तो या मायभूमीत सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या विक्रमात धोनीला मागे टाकेल.
४. विराट क्लाइव्ह लॉयड यांच्यावर ठरू शकतो वरचढ
पहिल्या कसोटी सामन्यात विराटने अवघ्या १४ धावा केल्यास तो वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांना पिछाडीवर सोडेल. विराटने कर्णधार असताना आतापर्यंत ५२२० धावा केल्या आहेत. लॉयड हे ५३३३ धावांसह या विक्रमाच्या यादीत विराटच्या पुढे आहेत. त्यामुळे १४ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करत विराटला लॉयड यांना मागे टाकण्याची संधी आहे.
या विक्रमाच्या यादीत ग्रीम स्मिथ (८६५९ धावा) अव्वलस्थानी विराजमान आहेत. तर ऍलन बॉर्डर (६६२३ धावा) आणि रिकी पाँटिंग (६५४२ धावा) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
५. विराटला कसोटीत सर्वाधिक शतके करणारा कर्णधार होण्याची संधी
ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांनी कर्णधाराच्या रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४१ शतके केली आहेत. यासह ते सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे पहिले कर्णधार आहेत. विराट याबाबतीत पाँटिंग यांच्या बरोबरीवर आहे. जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एकही शतक केले तर पाँटिंग यांचा मोठा विक्रम विराटच्या नावे होईल.
६. पाँटिंगला मागे टाकण्याची विराटला संधी –
या कसोटी मालिकेत जर विराटने किमान २ शतके केली तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत रिकी पाँटिंगला मागे टाकेल. सध्या पाँटिंगच्या नावावर ७१ शतके आणि विराटच्या नावावर ७० शतके आहेत. तसेच या यादीत सचिन तेंडुलकर १०० शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे.
७. आर अश्विन टाकू शकतो हरभजन सिंगला मागे –
आर अश्विनने त्याच्या कारकिर्दीत भारतात खेळताना ४३ कसोटी सामन्यांमध्ये २५४ विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे मायदेशात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे त्याने जर या मालिकेत १२ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हरभजन सिंगला मागे टाकू शकतो. हरभजनने मायदेशात २६५ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
८. इशांत शर्माला १०० कसोटी सामने खेळण्याची संधी –
इशांतने आत्तापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे जर तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील किमान ३ सामने जरी खेळले तरी तो कारकिर्दीत १०० कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम करु शकतो. तसेच भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा ११ वा खेळाडू ठरु शकतो.
९. इशांत शर्माला ३०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याची संधी –
इशांतला त्याच्या कारकिर्दीत ३०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ ३ विकेट्सची आवश्यकता आहे. त्याने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत ३०० विकेट्स घेणारा भारताचा केवळ सहावाच गोलंदाज ठरेल. तसेच कपिल देव आणि झहिर खाननंतरचा तिसराच वेगवान गोलंदाज ठरेल.
१०. जो रुटला १०० कसोटी सामने खेळण्याची संधी –
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने त्याच्या कारकिर्दीत ९९ सामने खेळले आहेत. त्यामुळे आता भारताविरुद्ध होणारा पहिला सामना हा जो रुटचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा तो इंग्लंडचा १५ वा खेळाडू ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी
दे घुमा के! कोहलीने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची नक्कल, व्हिडिओ तूफान व्हायरल
“मागे उभारून कर्णधार कोहलीची मदत करणे, आता हेच माझे काम”, रहाणेचे मोठे भाष्य