जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. मे महिन्यात कोरोनामूळे स्पर्धातून स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
स्पर्धेच्या पूर्वार्धात विराट कोहलीचा नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने धडाकेबाज कामगिरी करत ७ पैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावलेले. मात्र, स्पर्धेचा उत्तरार्ध सुरू होण्याआधी त्यांच्या पाच विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. या पाच प्रमुख खेळाडूंच्या जागी नव्या पाच खेळाडूंना आरसीबी व्यवस्थापनाने पाचारण केले.
या खेळाडूंनी घेतली माघार
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झंपा व वेगवान केन रिचर्डसन हे आयपीएलचा पूर्वार्ध सुरू असतानाच बायो-बबलचे कारण देत स्पर्धेतून बाहेर गेले होते. त्यानंतर, आता संघातील न्यूझीलंडचा युवा फलंदाज फिन ऍलन, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्स व यष्टीरक्षक जोशुआ फिलीप यांनी आपण उर्वरित हंगामासाठी उपलब्ध नसल्याचे फ्रॅंचाईजीला सांगितले आहे. इंग्लंड दौऱ्यावर जखमी झालेला भारताचा प्रमुख अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हादेखील या उर्वरित हंगामाला मुकेल.
हे आहेत नवे शिलेदार
आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले काही विदेशी खेळाडू बाहेर गेल्यानंतर आरसीबी व्यवस्थापनाने त्याच तोलामोलाचे खेळाडू संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. जागतिक टी२० गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा व श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा यांना त्यांनी संधी दिली आहे. तसेच, सिंगापूरचा आक्रमक फटकेबाजी व जगभरातील टी२० लीगमध्ये शानदार कामगिरी करणारा टीम डेव्हिड हा देखील आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात आरसीबीसाठी खेळताना दिसेल. याव्यतिरिक्त, इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टन हा देखील प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होईल. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आकाश दीप या बंगालच्या वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला गेला आहे.
विराटला आपल्या खेळाडूंवर विश्वास
नव्या खेळाडूंविषयी बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला,
“काही अनुभवी खेळाडूंची सेवा आम्हाला यावेळी मिळणार नाही. मात्र, त्यांच्या जागी निवडलेले खेळाडू तितक्याच प्रतिभेचे आहेत. माझे या सर्वांशी बोलणे झाले असून, ते चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. या सर्वांसोबत लवकरात लवकर सराव करण्यास मी आतुर आहे.”
इंग्लंडमधून दुबई येथे दाखल झालेला विराट १५ किंवा १६ सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करू शकतो.