यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास सर्व संघ सज्ज झाले आहेत. यासाठी सर्व खेळाडू यूएईत पोहोचले आहेत. दरम्यान, पंजाब किंग्जच्या संघाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि वसीम जाफर ‘कराओके’ कार्यक्रमात एक गाणे गाताना दिसत आहेत.
त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना पंजाब किंग्सने लिहिले की, ‘पीबीकेएस कराओके, एका वेगळ्या खेळपट्टीवर क्रिकेटचे दोन दिग्गज!’
पंजाब किंग्जने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कुंबळे आणि जाफरची जुगलबंदी दिसत आहे. दोघे ‘कभी अलविदा ना कहना …’ हे गाणे गात आहेत. ‘कभी अलविदा ना कहना’ हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले आहे आणि शंकर-एहसान-लॉय यांनी त्यास संगीत दिले आहे तर सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी ते गायले आहे. त्यांचा हा न पाहिलेला अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
दरम्यान आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पहिला सामना पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि तीन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलचे उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे २७ दिवसात खेळवले जातील. आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा कोरोना महामारीमुळे ४ मे रोजी पुढे ढकलण्यात आला होता. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले होते.
https://www.instagram.com/tv/CTxUdgLh3qG/?utm_source=ig_web_button_share_sheet
आयपीएल २०२१ च्या स्थगितीपर्यंत दिल्ली कॅपिटल्स ८ सामन्यांत ८ विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स ५ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ पाच विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे.
पंजाब किंग्स दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दोन्ही संघांमधील हा सामना २१ सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. पंजाब संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी ३ जिंकले आहेत आणि ५ गमावले आहेत. त्यांचा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ पदार्थ पाहताच ‘फिटनेस किंग’ कोहलीच्या तोंडाला सुटतं पाणी, आवडत्या डिशचं नाव माहितंय का?
धोनीनंतर ‘या’ शिलेदाराला बनायचं आहे सीएसकेचा उत्तराधिकारी! इशाऱ्यांमध्ये सांगितली मनातील गोष्ट
आयपीएल मोहिमेपूर्वी कर्णधार कोहलीचा नवख्या शिलेदाराला व्हॉट्सअप मॅसेज, लिहिले ‘हे’ प्रेरणादायी शब्द