नुकताच भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा (Tour of New Zealand) संपला. हा दौरा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) फलंदाज म्हणून अपयशी ठरला. विराटला न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20, वनडे आणि कसोटी मालिकेतील 11 डावांमध्ये फक्त 1 अर्धशतक करता आले.
विशेषत: कसोटी मालिकेत विराटचा खराब फॉर्म भारतीय संघाच्या पराभवाच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक ठरले.
विराट न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरला. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑफ स्टंपला लक्ष बनवत विराटला गोत्यात आणले. यानंतर विराट सरळ येणाऱ्या चेंडूंवरही बाद होत राहिला.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा असा विश्वास आहे, की कदाचित विराटचे वय वाढत चालल्यामुळे त्याची चपळता कमी झाली आहे. त्यामुळे त्याची दृष्टीही कमी होत आहे. म्हणूनच त्याला आपल्या डोळ्यांच्या क्षमतेशी संतुलन बनविण्यासाठी सराव करण्याची आवश्यकता आहे.
“जेव्हा तुम्ही एका वयापर्यंत पोहोचता. म्हणजेच 30 वर्षे पूर्ण करता, तेव्हा वयामुळे आपोआप आपल्या दृष्टीवर परिणाम होतात. स्विंग चेंडूविरुद्ध खेळताना विराटची जी ताकद असायची, त्यामध्येच तो आता बाद होत आहे. यामध्ये विराट आतापर्यंत 2 वेळा बाद झाला आहे,” असे एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले.
“मला असे वाटते की विराटने त्याच्या दृष्टीला नियंत्रित केले पाहिजे. कारण जेव्हा मोठे फलंदाज गोलंदाजांच्या चेंडूवर पायचीत होतात, तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येते की तुमचे डोळे आणि तुमची सतर्कता मंदावलेली आहे. त्यामुळे काही वेळातच तुमची ताकद तुमच्यातील कमतरता बनते. यावेळी फलंदाजांना अशा चेंडूविरुद्ध खेळण्यासाठी अधिक सराव करण्याची गरज असते,” असेही कपिल देव म्हणाले.
“18-24 वयापर्यंत, तुमची दृष्टी उत्तम असते. परंतु त्यानंतर आपण त्यावर कशाप्रकारे काम करतो, यावर ते अवलंबून आहे. विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हिव्ह रिचर्ड्स, अशा फलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीत अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विराटला अधिक सराव करण्याची गरज आहे,” असेही कपिल यावेळी म्हणाले.
“जेव्हा तुमची दृष्टी कमी होते तेव्हा तुम्हाला तुमचे तंत्र अधिक मजबूत करावे लागते. ज्या चेंडूवर विराट खूप जलदगतीने खेळत होता. त्याच चेंडूवर आता विराटला खूप वेळ लागतो,” असेही कपिल देव यावेळी म्हणाले.
आयपीएल 2020 अगदीच जवळ येत आहे. त्यामुळे विराटला आपल्या फॉर्ममध्ये यायला मदत होईल असे कपिल देव यांनी म्हटले आहे. “मला असे वाटते की, विराटला फॉर्ममध्ये येण्यासाठी आयपीएलची मदत होईल. तो एक महान क्रिकेटपटू आहे. तो निश्चितपणे हे सर्व अनुभव घेईल आणि त्याच्यात सुधारणाही करेल,” असे आयपीएलबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-