लॉर्ड्स कसोटीमध्ये (इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी) झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघ गंभीर दबावाखाली आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आता अष्टपैलू बेन स्टोक्सला तिसऱ्या कसोटीसाठी परतण्यास सांगू शकतो. बेन स्टोक्सने मानसिक तणावामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मात्र, त्याच्या मुद्द्यावर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी मंगळवारी (१७ ऑगस्ट) महत्त्वाचे विधान केले आहे.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, कसोटी मालिकेत संघर्ष करूनही आम्ही बेन स्टोक्सवर परतण्यासाठी दबाव आणणार नाही. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत भारताकडून १५१ धावांनी पराभूत झाल्यानंतर एक दिवसानंतर, सिल्व्हरवूड यांनी सांगितले की स्टोक्सला सावरण्यासाठी आवश्यक तितका वेळ दिला जाईल. पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही हेच सांगितले.
सिल्वरवूड म्हणाले की, “मला वाटते की, आम्ही स्टोक्सला परत येण्यास सांगणार नाही. मला वाटत नाही की, तुम्ही अशा परिस्थितीत त्याच्यावर दबाव निर्माण करू शकता. मी वाट पाहीन. तो स्वतः परत येऊन, मी खेळायला तयार आहे, असे म्हणत नाही. तोपर्यंत आम्ही त्याची प्रतिक्षा करू.”
गेल्या महिन्यात इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वाखाली एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवल्यानंतर स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
स्टोक्सचे आरोग्य अधिक महत्त्वाचे
सिल्वरवुडने रूटच्या या मुद्द्याचे समर्थन केले की, मानसिक आरोग्यासारख्या संवेदनशील विषयावर कोणावरही दबाव आणला जाऊ शकत नाही. ते म्हणाले, “यामध्ये वेळेची मर्यादा नाही. मी हे पुन्हा सांगत आहे की स्टोक्स आणि त्याच्या कुटुंबासाठी त्याने निरोगी राहणे महत्वाचे आहे. जेणेकरून तो दमदार पुनरागमन करू शकेल. इंग्लंड संघात परत येण्यास आणि चांगली कामगिरी करण्यास तो मानसिकदृष्ट्या तयार आहे असे त्याला वाटल्यास आम्ही नक्की त्याला संघातील त्याचे स्थान परत देऊ.”
इंग्लंड बुधवारी तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करू शकतो. वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्याजागी दुसरा वेगवान गोलंदाज मैदानावर उतरु शकतो. तिसरी कसोटी २५ ऑगस्टपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
नेहमी शांत राहणाऱ्या रहाणेचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर, केली ‘ही’ भन्नाट पोस्ट; तुम्हीही पाहा
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज संघाबाहेर?
लॉर्ड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर जो रूट सोडेल नेतृत्त्वपद, माजी कर्णधाराने व्यक्त केली चिंता