नव्या दमाचा विस्फोटक खेळाडू यशस्वी जयसवाल याने गुरुवारी (दि. 11 मे) आयपीएल 2023च्या 56व्या सामन्यात वादळी फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत 47 चेंडूत नाबाद 98 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. या वादळी फलंदाजीच्या जोरावर त्याने असंख्य क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. जयसवालच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने 150 धावांचे आव्हान राजस्थानने 13.1 षटकात पार करत विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा दावा केला.
या सामन्यात कोलकाताच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याला कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याचीही साथ मिळाली. संजूने 29 चेंडूत नाबाद 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. सामन्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दावा केला की, जयसवालला आयपीएल संपल्यानंतर निवडल्या जाणाऱ्या भारतीय टी20 संघात सर्वात पहिले निवडले जाईल.
रवी शास्त्री यांचा दावा
जयसवालच्या मॅच विनिंग खेळीनंतर रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “ज्यांनीही जयसवालची खेळी पाहिली, सर्वांनी त्याचे एकस्वरात कौतुक केले. त्याने ऑफ साईडला मारलेले शॉट्स पाहिले, तर त्याचे डोके एकदम सरळ आणि स्थिर असते. तसेच, पायांच्या हालचालीत कुठलीच कमतरता नाहीये. कोणताही खेळाडू, जो फक्त 21 वर्षांचा आहे, तो खूपच कठीण मार्गातून पुढे आला आहे.”
शास्त्रींना यावेळी विचारले गेले की, तो भारतीय संघात कधीपर्यंत येईल. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, “लगेच, निवडकर्ता जे ते पाहत आहेत, ते त्याला खेळताना पाहणे पसंत करतील. त्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर अशी प्रतिभा पाहण्याची इच्छा होईल. अशी प्रतिभा जी प्रत्येक क्रिकेट प्रकारात शानदार आहे.”
शास्त्री पुढे म्हणाले की, “खासकरून ते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टी20 क्रिकेटमध्ये आपल्या संघासाठी येतो आणि याची चिंता करत नाही की, त्याच्यापुढे कोण आहे. संघात निवडताना पहिले नाव त्याचेच असेल.”
यशस्वी जयसवालचा विक्रम
गुरुवारी रात्री जयसवालने फक्त 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. आता आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जयसवाल हा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्याने केएल राहुल (KL Rahul) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांचा विक्रम मोडला होता. या दोघांनीही जयसवालपूर्वी आयपीएलमध्ये प्रत्येकी 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत जयसवालने आतापर्यंत खेळलेल्या 12 डावांमध्ये त्याने 575 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. (yashasvi jaiswal will be the 1st name to be picked for india in t20is says former head coach ravi shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLमध्ये 12 मे रोजी एकदाही हारली नाही मुंबई, स्पेशल आहे दिवस; कायरन पोलार्डशी जबरदस्त कनेक्शन
पोलार्डचे 36व्या वर्षात पदार्पण! टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा जगातला एकमेव पठ्ठ्या