१९७९ सालचा इंग्लंड दौरा भारतासाठी फारसा चांगला ठरला नाही. कारण, त्यावर्षी झालेल्या दुसर्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना भारताला जिंकणे शक्य झाले नाही. त्या स्पर्धेदरम्यान भारताला सहयोगी देश श्रीलंकेकडून ४७ धावांनी नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या इंग्लंडविरुद्ध झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत देखील भारताची दुरवस्था कायम राहिली.
बर्मिंघम येथे झालेली पहिली कसोटी भारताने डाव आणि ८३ धावांनी गमावली. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ९६ धावांवर सर्वबाद होऊनही तो सामन्यात वाचवण्यात भारताला यश आले. हेडिंग्ले येथे नियोजित असलेल्या तिसऱ्या कसोटीत पावसामुळे पहिल्या तीन दिवसांचा खेळ न झाल्याने तो सामना देखील अनिर्णित राहिला. मालिकेतील अखेरचा सामना ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर यादरम्यान ओव्हलवर होणार होता.
क्रिकेट जगतातील सर्वात चतुर कर्णधार म्हणून ओळखले जाणारे माईक ब्रेअर्ली त्यावेळी इंग्लंड संघाचे कर्णधार होते. तर भारतीय संघाची कमान श्रीनिवासन वेंकटराघवन यांच्या हाती होती. ब्रेअर्ली यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी करत इंग्लंडने धावफलकावर २४५-५ धावा लावल्या. ग्रॅहम गूच यांच्या ७९ व व पीटर विली यांच्या ५२ धावांमुळे इंग्लंड सुस्थितीत होता. दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त धावा काढण्याच्या इंग्लंडच्या स्वप्नांना भारतीय गोलंदाजांनी सुरुंग लावला. इंग्लंडचे उरलेले पाच फलंदाज अवघ्या साठ धावांत बाद करत भारताने इंग्लंडला ३०५ धावांवर रोखले. भारतातर्फे कपिल देव व कर्णधार वेंकटराघवन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.
बॉब विलीस, माईक हेंड्रिक्स व इयान बोथम या वेगवान तिकडीसमोर भारताची वाताहत झाली. भारत अवघ्या २०२ धावा जमवू शकला. भारतातर्फे गुंडाप्पा विश्वनाथ यांनी सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली तर यजुर्वेद सिंग ४३ धावांवर नाबाद राहिले.
इंग्लंडने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही जोरदार फलंदाजी केली. जेफ्री बॉयकॉट यांनी सात तास फलंदाजी करत १२५ धावा फटकावल्या. इंग्लंडने आपला दुसरा ३३४-८ या धावसंख्येवर घोषित केला. भारताला विजयासाठी ५०० मिनिटांत ४३८ धावांचे लक्ष देण्यात आले.
दुसऱ्या डावात भारताची सलामीची जोडी सुनील गावसकर व चेतन चोहान हे पहाडा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरले. चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत, दोघांनीही नेटाने किल्ला लढवत बिनबाद धावा ७६ भारताच्या खात्यात जमा केल्या. पाचव्या दिवशी देखील त्यांनी अजिबात घाई केली नाही. पाचव्या दिवशी पहिल्या तीन तासात त्यांनी १३७ धावा जोडल्या. अखेर, भारताच्या २१३ धावा झाल्या असताना बॉब विलीस यांनी चौहान यांना वैयक्तिक ८० धावांवर बोथम यांच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
तोपर्यंत गावसकर यांनी आपले शतक पूर्ण केले. गावकरांची साथ देण्यासाठी दुसरे मुंबईकर दिलीप वेंगसरकर मैदानात उतरले. विजयासाठी अजूनही २२५ धावांची गरज असल्याने गावसकर यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावसकर-वेंगसरकर या जोडीने १५३ धावांची भागीदारी केली. याच दरम्यान गावसकर यांनी आपले तिसरे आंतरराष्ट्रीय द्विशतक झळकावले. भारताला विजयासाठी २० षटकात ११० धावा हव्या होत्या. भारताची धावसंख्या ३६६ झाली असताना, वेंगसरकर बाद झाले. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले कपिल देव यांना चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. मात्र ते पाच चेंडू खेळून एकही धाव न काढता तंबूत परतले. कपिल देव बाद झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाने अनुभवी गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या जागी अननुभवी यशपाल शर्मा यांना फलंदाजीला पाठवण्याचा जुगार खेळला. संघाच्या खात्यात अजून २२ धावा जोडून गावसकर देखील बोथम यांचे शिकार झाले. बाद होण्यापूर्वी गावसकर यांनी २२१ धावांची अफलातून खेळी करत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले होते.
गावसकर बाद झाल्यानंतर अनुभवी विश्वनाथ मैदानात उतरले. भारताला अजूनही विजयासाठी ८ षटकात ४९ धावांची गरज होती. विश्वनाथ यांनी १२ चेंडूत दोन चौकार मारत १५ धावा काढल्या. वेगाने धावा काढायच्या नादात यजुर्वेद सिंग १ तर कर्णधार वेंकटराघवन ६ धावा काढून बाद झाले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यशपाल शर्मा यांनी प्रयत्नांची शर्थ करत २९ चेंडूत १९ धावा फटकावल्या.
अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १५ धावांची गरज होती. यष्टीरक्षक भरत रेड्डी यांनी चौकार मारला तरीही पहिल्या पाच चेंडूत अवघ्या सहा धावा आल्या. अखेरच्या चेंडूत, ९ धावा आवश्यक असल्याने पंचांनी व दोन्ही कर्णधारांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
भारताचे प्रयत्न अवघे ९ धावांनी कमी पडले आणि भारत एका ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला. सुनील गावस्कर यांना त्यांच्या लाजवाब द्विशतकासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचाः
पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या ‘किरण मोरें’ची गोष्ट
वाढदिवस विशेष: क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर