आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात अनेक अनकॅप्ड खेळाडूंनी (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले खेळाडू) आपले कौशल्य दाखवले आणि त्याच कारणामुळे पहिल्या टप्प्यात खेळलेल्या काही खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. देवदत्त पडिक्कल, चेतन साकरिया, नितीश राणा सारख्या अनकॅप्ड खेळाडूंना पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्यामुळेच पदार्पणाची संधी मिळाली.
अजूनही काही खेळाडू आहेत, ज्यांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली, पण त्यांना फारशी संधी मिळाली नाही. अशा स्थितीत ते खेळाडू दुसऱ्या टप्प्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. या लेखात, आपण अशा तीन अनकॅप्ड खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करू शकतात.
शाहरुख खान
तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मधल्या फळीत मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शाहरुख खानला, आयपीएल २०२१ च्या लिलावात पंजाब किंग्सने मोठ्या रक्कम देऊन खरेदी केले. शाहरुखने पंजाबसाठी पहिल्या टप्प्यात काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली, पण आतापर्यंत तो ज्या खेळासाठी ओळखला जातो, त्या पातळीवर कामगिरी करू शकलेला नाही.
शाहरुखने पहिल्या ८ सामन्यांमध्ये १२७.३८ च्या स्ट्राईक रेटने १०७ धावा केल्या आहेत. मात्र, शाहरुखची क्षमता पाहता हे असे सांगता येईल की, दुसऱ्या टप्प्यात तो जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला फायदा करून देऊ शकतो.
आवेश खान
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानसाठी खूप चांगला ठरला. या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवेशने आपली क्षमता दाखवली. स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली आणि सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. आवेशने पॉवरप्ले आणि शेवटच्या षटकांमध्ये अतिशय हुशारीने गोलंदाजी केली आणि विकेटही घेतल्या होत्या. आवेशच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिल्लीला रबाडाच्या खराब फॉर्मचा फारसा त्रास झाला नाही.
आवेशने ८ सामन्यांत ७.७० च्या इकॉनॉमी रेटने १४ विकेट्स घेतल्या आहेत. स्थानीक क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच आवेशला नेट गोलंदाज म्हणून इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, सराव सामन्यादरम्यान तो जखमी झाला. अशा परिस्थितीत, आवेश पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या टप्प्यात जबरदस्त गोलंदाजी करताना दिसू शकतो.
हर्षल पटेल
गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या हर्षल पटेलसाठी हा हंगाम अतिशय चांगला ठरला आहे. हर्षलला यावेळी आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सकडून विकत घेतले आहे. त्याला डावाच्या मधल्या आणि शेवटच्या षटकांत गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली आहे.
हर्षलने संपूर्ण हंगामात ही जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली आणि विरोधी फलंदाजांना त्याच्या विविध प्रकारच्या चेंडूंनी बाद केले. हर्षल पर्पल कॅपचा मानकरी होता, त्याने पहिल्या टप्प्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात, हा खेळाडू तीच लय कायम ठेवत दणक्यात कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत धडक मारू शकणारे ४ संघ, भारताचं नाव आहे की नाही?
आयपीएल २०२१: चेन्नई संघात दुखापतग्रस्त फाफ डू प्लेसिसची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ क्रिकेटर