गोवा। ग्रेग स्टीवर्टच्या हॅटट्रिकच्या जोरावर जमशेदपूर एफसीनं हिरो इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) मंगळवारी झालेल्या सामन्यात ओडिशा एफसीवर दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयएसएलमधील पहिली हॅटट्रिक नोंदवण्याचा मान स्टीवर्टनं पटकावला. जमशेदपूर एफसीनं बाजी मारताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसी व त्यांच्यातील गुणांचे अतंर कमी केले. मुंबई १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर जमशेदपूरच्या खात्यात ११ गुण झाले आहेत.
पीटर हार्टली (३ मि.) आणि ग्रेग स्टीवर्ट ( ४ मि., २१ मि., ३५ मि.) यांनी पहिल्या हाफमध्येच जमशेदपूरला ४-० अशी आघाडी मिळवून देताना ओडिशाचे मानसिक खच्चीकरण केले. त्यानंतर ओडिशा एफसीला कमबॅक करणे अवघड गेले आणि जमशेदरपूरनं मोठा विजय मिळवला. ओडिशा एफसीच्या बचावफळीतील उणीवा जमशेदपूरनं या सामन्यात उघड्यावर आणल्या.
४-२-३-१ अशा रणनितीनं मैदानावर उतरलेल्या जमशेदपूर एफसीनं पहिल्या पाच मिनिटांत दोन गोल करून ओडिशा एफीवर दडपण निर्माण केलं. पीटर हार्टली आणि ग्रेग स्टीवर्ट ही जोडी आज जमशेदपूरसाठी लकी ठरताना दिसली. तिसऱ्या मिनिटाला स्टीवर्टच्या क्रॉसवर हार्टलीनं हेडरद्वारे पहिला गोल केला. ओडिशाचा मध्यरक्षक विनित रायला चकवून हार्टलीनं गोलरजाळीच्या उजव्या कॉर्नरवरून हा गोल केला. पुढच्याच मिनिटाला ओडिशाच्या खेळाडूंनी बॉक्समध्ये केलेल्या चुकीचा फायदा स्टीवर्टनं उचलला आणि गोलरक्षक कमलजीत सिंगकडे चेंडू गोलजाळीत जाताना पाहण्यापलीकडे काहीच ठेवले नाही. चार मिनिटांत जमशेदपूर एफसीनं २-० अशी आघाडी घेऊन सामन्यावर पकड बनवली.
मागील सामन्यात गतविजेत्या मुंबई सिटी एफसीकडून ४-२ असा दारूण पराभव पत्करावा लागलेला जमशेदपूरचा संघ असं कमबॅक करेल, याचा ध्यानीमनी कुणीच विचार केला नव्हता. त्यात २१व्या मिनिटाला स्टीवर्टनं फ्री किकवर अफलातून गोल करताना जमशेदपूरची आघाडी ३-० अशी मजबूत केली. स्टीवर्टनं ओडिशाच्या बचावपटूंना कळसूत्री बाहुल्यांसारखे नाचवले. ३५व्या मिनिटाला मध्यभागापासून चेंडू एकट्यानं गोलजाळीच्या दिशेनं घेऊन जात स्टीवर्टनं गोलरक्षकाला चकवून आणखी एक गोल केला. आयएसएल २०२१-२२ मध्ये पहिल्या हॅट्रिकचा मान स्टीवर्टनं पटकावला. ३८व्या मिनिटाला जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टीपी रेहेनेशनं ओडिशा एफसीचा पहिला गोल अडवला. पहिल्या हाफमध्ये जमशेदपूर एफीनं निर्विवाद वर्चस्व गाजवताना ४-० अशी भक्कम आघाडी घेतली.
आता दुसऱ्या हाफमध्ये ओडिशा कोणत्या रणनीतीसह मैदानावर उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ओडिशानं मध्यरक्षक व बचावफळीत प्रत्येकी एक बदल करताना जमशेदपूरचं आक्रमण थोपवण्याची रणनीती आखली. पण, स्टीवर्ट व हार्टली ही जोडी आज भन्नाट फॉर्मात होती. ५३व्या मिनिटाला स्टीवर्टनं मारलेला क्रॉस गोलरक्षकाला अडवण्यात यश आलं. ६४व्या मिनिटाला ओडिशाला गोल करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांना अपयश आलं. हाताशी आघाडी असूनही जमशेदपूरचा आक्रमक खेळ सुरूच होता आणि त्यांच्याकडून वारंवार गोल करण्याचे प्रयत्न होतच राहिले. ओडिशा एफसीचे सारे प्रयत्न तुटपूंजे ठरले. जमशेदपूरनं पहिल्या हाफमध्ये घेतलेल्या आघाडीवरच हा सामना ४-० असा जिंकला.
निकाल – जमशेदपूर एफसी – ४ ( पीटर हार्टली ३ मि., ग्रेग स्टीवर्ट ४ मि., २१ मि. व ३५ मि. ) विजयी विरूद्ध ओडिशा एफसी – ०.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई सिटीविरुद्ध चेन्नईयन एफसीची लिटमस चाचणी
फॉर्मात असलेल्या ओडिशा एफसीविरुद्ध जमशेदपूरची लागणार कसोटी
आयएसएल: एससी ईस्ट बंगालचे पहिल्या विजयाचे स्वप्न केरळा ब्लास्टर्समुळे भंगले