कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता कुठे क्रिकेट पूर्वपदावर येत आहे. अशात जगभरातील काही देशात नव्या कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्याची वेळ येऊ लागली आहे. इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे त्यांचा नववर्षात होणारा श्रीलंका दौरा संभ्रमात होता. पण नुकतेच असे वृत्त पुढे आले की, ठराविक वेळापत्रकानुसार इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात १४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापुर्वी इंग्लंड संघाच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे शनिवारी (२ जानेवारी) इंग्लंड संघ श्रीलंकाला रवाना होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने याविषयी माहिती दिली आहे.
कोविड-१९ प्रोटोकॉलनुसार इंग्लंड संघाचे सर्व सदस्य श्रीलंकामध्ये पोहोचल्यानंतर काही दिवस विलगीकरणात राहतील. त्यानंतर २ दिवसांची त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. दरम्यान कोरोना निगेटिव्ह आढळलेल्या खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाईल.
श्रीलंका संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
जरी इंग्लंड संघ लवकरच श्रीलंकाला पोहोचणार असला; तरी श्रीलंका संघ अद्याप दक्षिण आफ्रिकामध्ये आहे. तिथे दोन्ही देशात २६ डिसेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून दक्षिण आफ्रिकाने एक डाव ४५ धावांनी हा सामना जिंकला आहे. दुसरा व शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. हा सामना संपल्यानंतर श्रीलंका संघ मायदेशी परतेल.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड दरम्यान होणार २ कसोटी सामने
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात १४ जानेवारी रोजी होईल. १८ जानेवारीपर्यंत पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर २२ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत दुसरा कसोटी सामना होईल. हे दोन्ही सामने श्रीलंकाच्या गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येतील.
श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंड संघ येणार भारत दौऱ्यावर –
श्रीलंकेचा दौरा संपल्यानंतर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे-गिलचे जबरा शॉट पाहून पाँटिंगची बोलती बंद; म्हणाला, “ऑसी फलंदाजांमध्ये दमच नाही”
कोरोना इफेक्ट : सिडनी येथील भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीपूर्वी केल्या जात आहेत ‘या’ उपाययोजना
रहाणेने सुट्ट्यांमध्ये ‘हे’ काम केलं, म्हणूनच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या, प्रशिक्षकाचा खुलासा