इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने ही मालिका कमालीची अटीतटीची होणार हे जवळपास निश्चित आहे. तत्पुर्वी दोन्ही संघांनी या मालिकेसाठी दर्जेदार खेळाडूंची फौज उभी केलेली दिसते. यजमान भारताचा कर्णधार विराट कोहली याचे पहिल्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन होणार आहे.
या बहुचर्चित कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी प्रदर्शन करत मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची विराटकडे सुवर्णसंधी असणार आहे.
विराट ठरू शकतो सर्वाधिक शतके करणारा पहिला भारतीय
२०१२ ते २०१८ या कालावधीत विराटने पाहुण्या इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील १९ सामने खेळले आहेत. या सामन्यातील ३५ डावात फलंदाजी करताना या शिलेदाराने ४२.०६च्या सरासरीने १५७० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने प्रत्येकी २ शतके आणि अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर, विराटने इंग्लंड संघाविरुद्धच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २३५ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती.
तब्बल ५ शतकांसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यासह दिलीप वेंगसरकर आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ५ शतके केली आहेत. या विक्रमाच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि भारतीय दिग्गज राहुल संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक ७ कसोटी शतके केली आहेत. तर माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ६ शतकांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
जर विराटने इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत ३ शतके केली तर तो सचिन, द्रविड आणि अझरुद्दीन यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकेल. सोबतच भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा पहिला फलंदाज ठरेल.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज-
७ शतके- सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड
६ शतके- मोहम्मद अझरुद्दीन
५ शतके- विराट कोहली, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा
विराट आहे सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-६ दिग्गजांमध्ये
जर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर नजर टाकायची झाली, तर विराट याबाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुर्वी सचिनने सर्वाधिक २५३५ धावा करत प्रथम स्थानावर ताबा मिळवला आहे. ३२ सामन्यात त्याने ही धावसंख्या नोंदवली होती. तर सुनिल गावसकर ३८ सामन्यात २४८३ धावा करत सचिनमागोमाग दुसऱ्या स्थानी आहेत. शिवाय राहुल द्रविड, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगरसकर हेदेखील टॉप-६ मध्ये आहेत.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप-६ भारतीय फलंदाज-
सचिन तेंडूलकर- २५३५ धावा (३२ सामने)
सुनिल गावसकर- २४८३ धावा (३८ सामने)
राहुल द्रविड- १९५० धावा (२१ सामने)
गुंडप्पा विश्वनाथ- १८८० धावा (३० सामने)
दिलीप वेंगसरकर- १५८९ धावा (२६ सामने)
विराट कोहली- १५७० धावा (१९ सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय खेळाडूची कामगिरी ठरवेल भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा विजेता?, इंग्लंडच्या दिग्गजाचे भाकीत